ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - विभागातील नियमबाहय बांधकाम, अतिक्रमणा विरुद्ध मुंबई महापालिकेकडे तक्रार नोंदवणा-या सजग नागरीकांना आतापर्यंत पालिकेच्या कारभाराचा फारसा चांगला अनुभव आलेला नाही. तक्रार करुनही वर्षानुवर्षे कोणतीही कारवाई होत नाही असाच नागरीकांचा अनुभव आहे. पण लवकरच हे चित्र पालटू शकते.
मुंबई महापालिकेने आपल्या अधिका-यांना अतिक्रमणासंबंधीच्या तक्रारींची माहिती आणि काय कारवाई केली त्याची माहिती ऑनलाइन अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या मुंबई महापालिकेने विविध विभागांमध्ये सुधारणा करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
अतिक्रमणांच्या तक्रारीची माहिती ऑनलाइन केल्यामुळे जे अधिकारी दुर्लक्षाला कारणीभूत आहेत त्यांना जबाबदार धरता येईल अशी पालिकेची भूमिका आहे. महापालिकेने या आपल्या नव्या आदेशासंबंधी परिपत्रक काढले असून सर्वच्या सर्व २४ वॉर्डना या आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
अतिक्रमणा विरोधात तक्रार मिळाल्यानंतर १५ दिवसात ती माहिती ऑनलाइन अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमणाच्या पाहणीपासून ते पाडकामाची कारवाई करेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे अहवाल ऑनलाइन अपलोड करावेत असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या वॉर्डमध्ये या प्रक्रियेनुसार काम होणार नाही त्या वॉर्डातील संबंधित अधिका-यावर दुर्लक्षाचा ठपका ठेवण्यात येईल.