अकोला : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नऊ विद्यापीठांना लोककला व कलावंतांची माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. लोककला सादर करणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणात ही मोहीम हाती घेतली आहे.काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या राज्यातील लोककला व ती सादर करणाऱ्या कलावंतांची माहिती संकलित करण्याच्या उपक्रमात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सोलापूर विद्यापीठ, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचा अंतर्भाव करण्यात आला. एकूण पाच टप्प्यांत ही मोहीम राबविली जाणार असून, त्यात गोंधळ, भारूड, जागरण, भराड, पोतराज, शाहिरी, बहुरूपी, पिंगळा, धनगरी, सुंबरान, ओवी, वासुदेव, डोंबारी (कोल्हाटी), बोहाडा, जोगवा, वाघ्या मुरळी, घुमटाचा फाग, लळित, तमाशा, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, कीर्तन, भूत्या, दशावतार, दिमडी, दंडार, खंडीगंमत, कोरकू खम्मानाट्य, गोफ नृत्य, दंडीगान, तुकडी गान, झडती, ददरिया नृत्य, गौंड नृत्य, गंगासागर, घोर नाच, होळी नृत्य, पावरा नृत्य, बंजारा नृत्य यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
नऊ विद्यापीठे संकलित करणार लोककलांची माहिती
By admin | Published: August 08, 2015 1:43 AM