विकास राऊत , औरंगाबादमुंबईतील दादर येथील आंबेडकर भवनाची वास्तू पाडल्याच्या रागातून राज्याचे माहिती आयुक्त तथा माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड व त्यांच्या पत्नी शिवगंगा यांना भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास येथील सुभेदारी विश्रामगृहावर घडली.गायकवाड हे शासकीय दौऱ्यावर सपत्निक औरंगाबादेत सोमवारी सकाळी आले होते. ‘सुभेदारी’वर त्यांचा मुक्काम होता. सामान ठेऊन ते कोकणवाडीतील माहिती कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेले. दुपारी तीनच्या सुमारास ते परतले असता, भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. महिला कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुभेदारीत दडून बसलेल्या इतर कार्यकत्यांनी चोहोबाजूंनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी सुरक्षाकवच देईपर्यंत भारिपचे कार्यकर्ते गायकवाड दाम्पत्यास मारहाण करत होते. पोलिसांनी गायकवाड दाम्पत्याची सुटका करून विमानतळावर सुखरूप पोहोचविले. गायकवाड यांनी मुंबई विमानतळ पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, ती औरंगाबादेत वर्ग करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. या घटनेत दोन पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत. गायकवाड यांच्यावर राग होताच : डोळसमुंबईतील आंबेडकर भवन प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांनी आंबेडकरी चळवळीची, आंबेडकरी कुटुंबीयांची हेटाळणी केली, त्यामुळे आंबेडकरी समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड राग होता. तो कुठे ना कुठे व्यक्त होणारच होता. तो आज औरंगाबादेत झाला, अशी प्रतिक्रिया भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते प्रा. अविनाश डोळस यांनी व्यक्त केली. ते स्वत:च कारणीभूत ?रत्नाकर गायकवाड यांच्याबाबतीत आज जो प्रसंग उद्भवला, त्यास ते स्वत:च कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते अॅड बी. एच. गायकवाड यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आंबेडकर भवन हे प्रेरणास्थान आहे. तेथे बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांची कार्यालये होती. ती तोडून टाकणे हे योग्य नव्हते. ही कार्यालये उद्ध्वस्त करण्याचे काम गायकवाड यांनी केले नसते, तर आजचा प्रसंग उद्भवला नसता. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अमित भुईगळ आणि इतर कार्यकर्त्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा (कलम ३०७) गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय दंगलीचा (कलम १४७, १४८, १४९) तसेच सरकारी कामात अडथळा आणून दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी, शांताबाई धुळे, रेखा उजगरे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे यांनी हल्ला केला. या सर्वांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माहिती आयुक्त गायकवाड यांना औरंगाबादमध्ये बेदम मारहाण
By admin | Published: April 18, 2017 5:27 AM