वाडा : तालुक्यातील परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या मानव विकास कार्यक्रमाबाबत मच्छीन्द्र आगिवले यांनी मागवलेली सविस्तर माहिती देण्यास आरोग्य विभागाने टाळाटाळ केली आहे. त्यांनी ९ नोव्हेंबरला ती मागितली होती. मागविलेली माहिती संबंधित विभागाला विशिष्ट मुदतीत देणे बंधनकारक आहे. मात्र, वाड्यातील परळी प्राथमिक आरोग्य केंद्राने मानव विकास कार्यक्र मा अंतर्गत झालेल्या कार्यक्र माची माहिती माहिती महिनाभर दडपून ठेवली आहे. नियमानुसार एक महिनाभरानंतरही माहिती न मिळाल्यास अपिलात अर्ज केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने १७ डिसेंबरला लेखी पत्र देऊन आपली माहिती तयार असून २१२ पानांचे ४१४ रुपये शुल्क भरल्यास ही माहिती आपणास तात्काळ दिली जाईल असे कळविले आहे.त्यानुसार आगिवले यांनी स्टेट बॅँकेमध्ये या रक्कमेचा भरणा केला व ती परळी आरोग्य केंद्रात माहिती घेण्यास गेले असता पुन्हा अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली. अखेर २१ जानेवारीला अपरिहार्य कारणास्तव माहिती तयार नसून १० ते १२ दिवसांत माहिती देतो असे लेखी पत्र देण्यात आले मात्र, आज पर्यंत माहिती उपलब्ध झाली नाही. यामुळे ही माहिती दडपण्यात कोणाला स्वारस्य आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)> मी परळी आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याला याबाबत लेखी पत्र पाठविले असून माहिती येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. - दत्ता सोनावणे, आरोग्य अधिकारी (वाडा तालुका )
माहिती मागणाऱ्याला ‘तारीख पे तारीख’
By admin | Published: January 17, 2017 3:54 AM