मुंबई : रुळावरून ट्रेन घसरण्याच्या घटना रोखतानाच रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून नव्या अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब केला जाणार आहे. सिग्नल किंवा रुळांजवळ ‘इन्फ्रारेड कॅमेरे’ बसविण्याचे आदेश रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेला देण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुंबई हद्दीतील पाच ठिकाणी असे कॅमेरे बसविण्यात येतील. या कॅमेऱ्यांद्वारे अपघातांचे नेमके कारणही समजण्यास मदत होईल. रुळांवरून सतत ट्रेन जात असल्याने होणाऱ्या घर्षणामुळे चाके गरम होतात. तसे रूळही गरम होतात. त्यातूनच तापमानात सातत्याने होणारे बदल यामुळे रुळाला तडे जाण्याच्या घटना घडतात आणि ट्रेन रुळावरून घसरण्याच्या घटनाही होतात. मध्य रेल्वेवर सातत्याने अशा घटना घडत असल्याची बाब निदर्शनास आली. त्याची दखल घेत रुळांवरून ट्रेन घसरण्याच्या घटना रोखता याव्यात यासाठी नव्या यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे आदेश मध्य रेल्वेला दिले. त्यानुसार सिग्नल यंत्रणा तसेच रुळांजवळ किंवा महत्त्वाच्या यार्ड येथे इन्फ्रारेड कॅमेरे बसविण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, माझगाव येथील यार्डमध्ये आणि कुर्ला व कळवा कारशेडमध्ये बसविण्याचा विचार मध्य रेल्वेतर्फे सुरू आहे. त्यासाठी ५0 लाख रुपयांपर्यंत खर्च येणार असून, महाव्यवस्थापकांना तसे अधिकारही रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत.या कॅमेऱ्यांमध्ये उष्ण गोष्टी लाल-पिवळ्या आणि थंड गोष्टी निळ्या रंगात दर्शविल्या जातानाच ट्रेनचे चाक तसेच रूळ ठरावीक तापमानापेक्षा अधिक गरम झाल्यास त्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्ष किंवा ट्रेन मॅनेजमेंट आॅयंत्रणेला कॅमेऱ्यांद्वारे पोहोचवता येणे शक्य होणार आहे. तसेच घटनेच्या ठिकाणाची छायाचित्रेही या कॅमेऱ्यात साठवून ठेवता येतील. (प्रतिनिधी)
ट्रेन घसरणीच्या घटना रोखणार ‘इन्फ्रारेड कॅमेरे’
By admin | Published: October 21, 2016 3:01 AM