कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू महाराज यांची उद्या, सोमवारी १४३ वी जयंती साजरी होत आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे होते. त्यापैकी अठ्ठावीस वर्षे म्हणजे १८९४ मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून त्यांनी राज्यकारभार पाहिला. १९२२ मध्ये त्यांचे देहावसान झाले. आणखीन पाच वर्षांनी त्यांच्या स्मृतिदिनाची शताब्दी असेल.हा त्यांच्या कार्यकाळाचा शंभर वर्षांचा इतिहास समोर साक्षीसारखा ठेवूनच वाटचाल करीत आहोत, असे पदोपदी अनुभवास येते. एकविसाव्या शतकातील दुसरे दशक चालू आहे. या दशकाच्या आणि आधुनिक जगाच्या जागतिकीकरणातही राजर्षी शाहू विचार समोर ठेवूनच निर्णय घ्यावे लागतात. यातच त्यांच्या कार्याचे दूरदृष्टीपण आहे. सध्या महाराष्ट्रासह अनेक प्रांतांत शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे मोहोळ उठले आहे. कर्जमाफी आणि शेतमालाला रास्तभाव या प्रमुख मागण्यांच्या भोवती गुंजण घालणे चालू आहे. त्यामुळे या शेती क्षेत्राविषयी राजर्षी शाहू महाराज यांनी कोणकोणता विचार केला. त्यावर निर्णय काय घेतले, त्यांची अंमलबजावणी कशी केली, यावर प्रकाशझोत टाकणे महत्त्वाचे ठरते. मूळच्या कोल्हापूर संस्थानच्या क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील विकासाच्या प्रश्नांवर शाहू विचारानेच तोडगा निघू शकतो इतका तो शंभर वर्षांपूर्वीचा कृतिशील विचार होता. म्हणूनच शाहू महाराज यांना रयतेचा राजाच म्हटले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून जगभरातील ज्ञानाची जोड देऊन प्रजेच्या उन्नतीसाठी झटणारा राजा होता.आणखीन एका विशेष घटकावर लक्ष देऊन राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. भारतासारख्या देशाचा आजही विकसनशील देश असाच उल्लेख केला जातो. तो विकसित देश आहे, असे म्हटले जात नाही. कारण अनेक पातळीवर आपणास विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये (इन्फ्रास्ट्रकचर डेव्हलपमेंट) गुंतवणूक केली गेली पाहिजे असे वारंवार म्हटले जाते. हा अलीकडच्या काळात बळकट होत असलेला विचार आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक आणि काही प्रमाणात संशोधन, शिक्षण तसेच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. राजर्षींचे कार्य म्हणजे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी इन्फ्रास्ट्रकचर डेव्हलप करण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणारे ते इन्फ्रास्ट्रक्टर डेव्हलप करणारे जनकच होते.राजर्षी शाहू महाराज यांचे संस्थान देशाच्या आकाराने लहान होते; पण विचाराने ते महान (जागतिक) होते. याचे दोन घटक महत्त्वाचे होते. एक तर संपूर्ण जगभरात विशेषत: युरोप खंडात होणारा विकास त्यांनी स्वत: पाहिला होता. शिक्षणाबरोबरच उद्योग, व्यापार, कृषी क्षेत्राच्या विकासावर युरोपने कशा पद्धतीने भर दिला आहे, याचा त्यांनी अभ्यास करून आपल्या संस्थानच्या प्रजेला या सुविधा कशा उपलब्ध करून देता येऊ शकतील याचा विचार त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या देशातील जागतिकीकरणाची प्रक्रियाही त्यांनीच सुरू केली होती, असे म्हणायला वाव आहे. कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, कला, क्रीडा, पशुधन, तंत्रज्ञान, आदी सर्व क्षेत्रांत विकास साधायचा असेल, तर त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे, हे त्यांनी हेरले होते. त्यातूनच पाणी साठवणुकीसाठी तलाव, बंधारे, धरणे, उद्योगासाठी कारखानदारी, शिक्षणासाठी शिक्षण संस्था आणि वसतिगृहे, व्यापारासाठी बाजारपेठा, आधुनिक शेतीसाठी नवनवीन बियाणे, खते यांचा वापर अशा असंख्य गोष्टी त्यांनी करून ठेवल्या. यासाठी रस्ते, रेल्वे, आदी दळणवळणाची साधने निर्माण करणे.विकासासाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज असते. कुस्तीला ऊर्जितावस्था निर्माण करण्यासाठी किंवा त्या क्रीडा प्रकाराला लोकाश्रयाची जोड देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी खासबागेत खास स्टेडियम उभे केले. ते कुस्ती या क्रीडा प्रकाराचे प्रेरणास्थान झाले. खासबागेत कुस्ती खेळणे आणि ती जिंकणे ही अनेक पिढ्यांच्या कुस्तीगिरांची जीवनातील सर्वोच्च पदवी ठरू लागली. अशी प्रेरणास्थाने त्यांनी सर्वच क्षेत्रांत निर्माण करून ठेवली आहेत. याशिवाय त्यांनी विविध विकासकामांसाठी समाजातील मनुष्यबळातून कल्पकता, बुद्धिमता, धैर्य, शौर्य, बळ, हुशारी, आदींसुद्धा हेरून घेतली. शिकारीसाठी कोणत्या समाज घटकातील माणसांचा उपयोग करून घेता येईल, ज्यांच्याकडे ही कला आहे त्यांना बळ द्यावे, त्यांना संधी द्यावी, असा विचार त्यांनी केला. त्यामुळे मनुष्यबळ विकासाचेसुद्धा एक सुंदर मॉडेल त्यांनी बनविले होते. अनेक अभ्यासक, संशोधक आणि विचारवंतांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून ग्रंथ लिहिले आहेत. राजर्षी शाहू महाराज यांना साथ देणाऱ्या असंख्य रत्नांची यादी वाचायला मिळते. महाराजांनी नेमून दिलेली किंवा जबाबदारी टाकलेली ऐतिहासिक कामे या लोकांनी केली आहेत. म्हणजे उत्तम मनुष्यबळ निवडून ते घडविण्याचे कामही राजर्षी शाहू महाराज यांनी केले आहे. कुशल मनुष्यबळ विकसित करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम केंद्र सरकारने घेतला आहे. तो कार्यक्रम राजर्षी शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वीच आपल्या संस्थानात राबविला होता. वास्तविक, या सर्व माणसांचे पूर्व आयुष्य आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी केलेली कामगिरी याचा स्वतंत्र अभ्यास होणे गरजेचे आहे. आपण त्यांना राजाश्रय मिळाला म्हणून ती माणसे मोठी झाली असे म्हणतो. याचा अर्थ त्यांना मदतीची गरज होती, एवढा मर्यादित अर्थ नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार प्रक्रियेला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्यासाठी योग्य माणसं घडविण्याचा त्यांचा तो कृतिशील कार्यक्रम होता. म्हणून अनेक सत्यशोधक चळवळीतील, सहकारी, कृषी, शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, व्यापार, आदी क्षेत्रांतील नामवंत लोकांची फळीच तयार झाली.राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यात मोठेपणा हा आहे. विकासाची दृष्टी त्यात आहे. ते विकासाचे मॉडेल आहे. आजही कृषिक्षेत्र असो की, शिक्षणाच्या सुविधा, पायाभूत सुविधा निर्माण करणे असो की, धार्मिक, सामाजिक एकोपा जपणे, वाढविणे असो. या सर्वांच्यावेळी राज्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, कलाकार, खेळाडू, आदी सर्व क्षेत्रांतील लोकांना राजर्षी शाहूंंचा दाखला द्यावा लागतो. म्हणूनच महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, असे म्हटले जाते. ते उगाच नाही. राजर्षी शाहू महाराज यांचा हा वारसा घेऊनच पुढे जाऊ शकतो, त्यांच्या स्मृतीस अभिवादन!- वसंत भोसले
इन्फ्रास्ट्रकचर डेव्हलपर
By admin | Published: June 25, 2017 12:09 AM