मुंबई : आॅगस्ट महिन्यात कुर्ला भाभा रुग्णालयांत ३२ महिलांना तापाच्या इंजेक्शनची अॅलर्जी झाली होती. असाच प्रकार मंगळवारी रात्री विक्रोळी कन्नमवार नगरमधील महात्मा फुले रुग्णालयात घडला. या रुग्णालयात झाली. बालरोग विभागातील ३ ते ११ वयोगटातील ६ मुलांना रात्री इंजेक्शनमुळे अॅलर्जी झाली. त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले असून सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. अंजली शिंदे (१०), जयेश म्हस्के (११), अमित काळे (११), नागेश धोंगडे (९) आणि सानिया इएॅनो (३) या पाच मुलांबरोबर एक वर्षाच्या मुलाला नेहमीप्रमाणे अॅमॉक्सीलीन, सिफापॅराझोनच्या बरोबरीने कॅलव्युनिक अॅसिड ही प्रतिजैविके देण्यात आली होती. ही प्रतिजैविके दिल्यानंतर रात्री साडेबारा वाजता या मुलांना उलट्या होऊ लागल्या, थंडी वाजू लागली. काही मुलांना ताप भरला. या मुलांना इंजेक्शनची अॅलर्जी झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना औषधे देऊन तत्काळ सायन रुग्णालयामध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती पूर्व उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. एक वर्षीय मुलाला खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.रात्री तीनच्या सुमारास ५ मुलांना सायन रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना या इंजेक्शनमुळे थोडा ताप भरला होता आणि थंडी वाजू लागली होती. त्यांना जास्त त्रास जाणवत नव्हता. त्यांना औषधे दिल्यावर मुलांची प्रकृती स्थिर झाली. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या, यामध्ये काहीही आढळलेले नाही, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विक्रोळीत फुले रुग्णालयात ६ मुलांना इंजेक्शनची बाधा
By admin | Published: December 04, 2014 2:26 AM