श्री गुरुगणेश साहित्यनगरी, जालना : विदर्भासह स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यासह अशा विचारांच्या आपमतलबी व्यक्तींचा निषेध करणारा ठराव रविवारी मराठवाडा साहित्य संमेलनात करण्यात आला.जालना शहरातील गुरुगणेशनगरीत आयोजित ३७व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. दत्ता भगत, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, प्रा. किरण सगर, कार्यवाहक दादासाहेब गोरे, संमेलन स्वागताध्यक्ष विनयकुमार कोठारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी जालन्यात महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे विखारी व्यक्तव्य श्रीहरी अणे यांनी केले, हे संमेलन अणे व त्या आपमतलबी मंडळीचा तीव्र निषेध करीत असल्याचा ठराव या संमेलनात घेण्यात आला. तसेच, अंबाजोगाई हे आद्य कवी मुकूंदराज यांचे जन्मस्थान असून, मराठीत आद्यग्रंथ विवेकसिंधू हा येथेच लिहिला गेला आहे. म्हणून अंबाजोगाई येथे मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी मराठी विद्यापीठाची तात्काळ स्थापना करण्यात यावी, असाही ठराव घेण्यात आला. (प्रतिनिधी)
मराठवाडा साहित्य संमेलनात श्रीहरी अणेंचा निषेध
By admin | Published: April 11, 2016 3:02 AM