ऑनलाइन लोकमतनवी मुंबई, दि. 18 - ओला कार चालकाने जखमीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने रस्त्यालगत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात जखमी तरुणाचा उपचाराविना मृत्यू झाला असून अपघाताच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी ओला चालकाच्या साथीदाराला अटक केली आहे.
सीबीडी सेक्टर 15 येथील चौकात कार व मोटारसायकल यांच्यात धडक होवून अपघात झाल्याची घटना १४ जुलै रोजी रात्री घडली होती. भरधाव ओला चालकाला समोरील दुचाकीचा अंदाज न आल्याने कारची धडक लागून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या जमावाच्या तावडीतून वाचण्यासाठी ओला चालकाने जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने कारमधून नेले. दरम्यान, काही तासातच जखमीच्या पत्नीला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
पोलिसांनी संपूर्ण परिसरात, रुग्णालयात शोधाशोध करूनही जखमीची माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यालगत एका तरुणाचा मृतदेह सापडला. सचिन सुर्वे (32) असे त्याचे नाव असल्याचे समजले. त्याच्या पत्नीने देखील मृतदेह ओळखल्यानंतर सीबीडी पोलीस ठाण्यात ओला चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजू पठाण, चंद्रहार गोडसे यांचे पथक सलग दोन दिवस तपास सुरू केला. अखेर ओला चालकाला कार लपवण्यात तसेच पळण्यासाठी मदत केल्याप्रकरणी रईस खान याला अटक करण्यात आली. मात्र चालक अद्याप फरार आहे. त्याच्या कृत्यामुळे जखमीचा उपचाराविना मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सचिन सुर्वेला उपचारासाठी वेळीच रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचे प्राण वाचू शकले असते. मात्र ओला चालकाने पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी सुर्वेला नेरुळमधील एकांताच्या ठिकाणी रस्त्यालगत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी सफाई कामगारांना त्याठिकाणी मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
सुर्वेला धडक देणारी ओला कार रईस खान याचीच असून, अपघातावेळी तोच कार चालवत होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघातावेळी घटनास्थळी त्याला पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी देखील पोलिसांच्या संपर्कात आला आहे. अपघातानंतर त्याने नागरिकांच्या समक्ष सुर्वेला एमजीएम रुग्णालयात नेले. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तत्काळ आयसीयूमध्ये घेवून जाण्यास सुचवल्याने त्याने सुर्वेला वाशीला घेवून जाण्याऐवजी रस्त्यालगत फेकून दिले.
(२० हजार तरुणांना देणार ओला कंपनी प्रशिक्षण)