डिंभे : धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात ६.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. १३.५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आसणाऱ्या या धरणातील पाणीसाठा यंदा मार्चच्या सुरुवातीलाच निम्म्याहून अधिक कमी झाला आहे. सध्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ७३० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, घोड नदीपात्र व दोन्ही कालवे सुरू आसल्याने डिंभे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. धरणात सध्या ४९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.उन्हाळ्याचे दिवस व शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन करून काटकसरीने पाणी न वापरल्यास यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोड नदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणातच्या पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट झाली आहे. कुकडी प्रकल्पात सर्वांत महत्त्वाचे धरण समजल्या जाणाऱ्या या धरणात आजमितीस ४९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून अनुक्रमे ५५० व १८० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, सुरू असणाऱ्या आवर्तनामुळे या धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे.मागील वर्षी या तारखेला धरणात २६.५८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. त्यातुलनेत यंदाचा साठा जास्त वाटत असला, तरी परतीच्या पावसाने वेळेआधीच आखडता हात घेतलेल्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असेल. या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर या तालुक्यांतील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो.जानेवारी-फेबु्रवारीदरम्यान या धरणातून आवर्तन सुरू होते. या आवर्तनामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. उन्हाची तीव्रता वाढल्याने या धरणातून तातडीने पाणी सोडण्याविषयी वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे सध्या या धरणाचे दोन्ही कालवे सुरू असून सुमारे ७३० क्युसेक्सने धरणातून पाणी बाहेर पडत आहे. आजमितीस धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीकडे लक्ष देता शिल्लक आसणारे पाणी व उन्हाळ्याचा मार्च, एप्रिल, मे व जून महिने बाकी आसताना धरणातील शिल्लक पाणीसाठा ही चिंतेची बाब झाली आहे. अख्खा उन्हाळा बाकी आसताना धरणातील पाण्याची होत असलेली घट यामुळे पुढी तीन ते चार महिने शिल्लक पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.धरणाच्या पाण्यावर पोखरी, बोरघर या आदिवासी गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. जर याच गतीने पाण्याचा विसर्ग सुरू राहिला, तर आदिवासी गावांच्या पाणी योजना धोक्यात येऊन पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांनाही यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (वार्ताहर)
मार्चच्या सुरुवातीलाच डिंभे धरण झाले अर्धे रिकामे
By admin | Published: March 04, 2017 12:59 AM