लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : येत्या तीन वर्षांत आपण एक कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहोत, असे प्रतिपादन उपराकार लक्ष्मण माने यांनी शनिवारी कल्याणमध्ये केले.कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशनने वालधुनी येथे शनिवार आणि रविवारी भरवलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माने यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. विठ्ठल शिंदे हे संमेलनाध्यक्ष, तर नाना बागुल स्वागताध्यक्ष आहेत. प्रा. आनंद रत्नाकर अहिरे हे कार्यक्र माचे प्रमुख संयोजक आहेत. दलित चळवळीतील लोक आज रस्त्यावर उतरत नाहीत. ते पीएच.डी. किंवा डिग्री घेण्यासाठी वाचनालयात अभ्यास करताना दिसतात, अशी खंत माने यांनी व्यक्त केली. मागील सरकारच्या वेळेस गुडघाभर पाणी होते. आताच्या सरकारच्या वेळेस गळ्यापर्यंत पाणी आले आहे. आपण त्यात कधी बुडू, हे सांगता येत नाही, अशी टीका त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली. या साहित्य संमेलनात विविध परिसंवाद होत आहेत. भारूडकार मीराबाई उमप, कीर्तनकार अशोक सरस्वती, शाहिरी जलसाकार संभाजी भगत, गझलकार दत्ता जाधव गुरुजी हे आपली कला सादर करणार आहेत. या संमेलनापूर्वी ग्रंथफेरी काढण्यात आली. या संमेलनाला भन्ते गौतमरत्न थेरो, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष दयानंद किरतकर, दलितमित्र अण्णा रोकडे आदी उपस्थित होते.
एक कोटी लोकांना देणार बौद्ध धर्माची दीक्षा : माने
By admin | Published: May 14, 2017 2:45 AM