आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि १३ : सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होतात़ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह अन्य भागातून आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून २५ जूनपासून २४ तास दर्शनसेवा उपलब्ध करून देण्यात आली होती़ आषाढी काळात श्रींचे नित्योपचार बंद करून भाविकांच्या दर्शनाची सोय केली, मात्र १३ जुलै रोजी प्रक्षाळ पूजा करून नित्योपचारास प्रारंभ करण्यात आला आहे़ आषाढी वारीसाठी सर्व संतांचे पालखी सोहळे, शेकडोच्या संख्येने दिंड्या आणि लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागतात़ त्यानंतर पंढरपुरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागते़ या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून या काळात व्हीआयपी पास, आॅनलाईन दर्शन बंद केले जाते़ नित्योपचारातही बदल केले जातात़ आषाढीत केवळ पहाटे ४ ते ५ या कालावधीत काकड आरती व नित्यपूजा, १०़४५ ते ११ महानैवेद्य आणि रात्री ८़४० ते ९़१० पर्यंत लिंबू पाण्याचा नैवेद्य इतकेच नित्योपचार केले जातात़ नित्योपचार पूर्ववत करण्यासाठी प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे़ त्यानुसार १३ जुलै रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या हस्ते प्रक्षाळ पूजा करण्यात आली आणि नित्योपचारास प्रारंभ झाला़ यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, डॉ़ दिनेश कदम यांच्यासह अन्य सदस्य व मंदिर समितीचे पदाधिकारी, कर्मचारी व पुजारी उपस्थित होते़------------------अशी केली जाते प्रक्षाळ पूजानित्योपचार पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रक्षाळ पूजा केली जाते़ यादिवशी मंदिराचा गाभारा व परिसर स्वच्छ केला जातो़ श्रीस व रुक्मिणी मातेस अभ्यंग लावले जाते़ श्रींस लिंबू साखर लावून नंतर दुग्धाभिषेक केला जातो़ त्यानंतर अलंकार घातले जातात़ सुवासिक फुलांनी श्रींचे तसेच रुक्मिणी मातेचे शेजमंदिर गाभारा, मंदिर परिसर सजविला जातो़ रात्री शेजारतीनंतर १४ वनस्पतींनी तयार केलेला काढा श्रींस दाखविला जातो़ अशा पद्धतीने प्रक्षाळ पूजा केली जाते, असे नित्योपचार प्रमुख हणमंत ताटे यांनी सांगितले़
पंढरपूरच्या विठ्ठल मंदीरात प्रक्षाळपूजेने नित्योपचारास प्रारंभ
By admin | Published: July 13, 2017 7:45 PM