अपर्णा जगताप,
मुंबई- राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. या परिस्थितीत काही अपार्टमेंट, सोसायट्यांनीदेखील पाण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील हायवे दर्शन सोसायटीने अनोखी उपाययोजना केली. या सोसायटीचे सचिव प्रशांत वाढीवकर यांनी दोन्ही इमारतींतील सगळ्या घरांमधील गळतीची तपासणी करून ते दुरुस्त करून घेतले. दिवसभर पाणी वापरण्याऐवजी दुपारी २.३० ते सायं. ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे महानगरपालिकेकडून पाणी कमी आल्यास या साठ्याचा उपयोग सोसायटीला होऊ लागला आहे. आठवड्यातून एकदाच गाड्या धुण्याचे आवाहन सभासदांना करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीबचत होत आहे. बोअरिंगचे पाणी झाडांसाठी वापरण्यात येते. सोसायटीच्या आवारात वापरासाठी बसवण्यात आलेल्या ३ नळांपैकी २ नळांचे कनेक्शन गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळेही अतिरिक्त पाणी वापर कमी झाल्याचे वाढीवकर यांनी सांगितले. ‘गरजेपुरता पाण्याचा वापर’ असा संदेश या सोसायटीकडून दिला जात आहे. चुनाभट्टीतील गिरीश अपार्टमेंट आणि ठाण्यातील साकेत अपार्टमेंट यांनीही पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या दिवसभर पाणी सोडण्याऐवजी फक्त अर्धा तासच पाणी सोडले जात आहे. विशेष म्हणजे सर्व सभासद या उपक्रमाला साथ देत आहेत. कमी पाण्यात अधिकाधिक दैनंदिन कामे करण्याकडे या दोन्ही सोसायट्यांचा कल आहे.