सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या काशीळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून काशीळ गावाजवळ झालेल्या अपघातात जखमी चिमुकलीचाही मृत्यू झाला. अपघातातील मृतांची संख्या सात झाली असून हे सातहीजण एकाच कुटुंबातील आहेत. वृद्ध आई-वडिलांना हज यात्रेला सोडण्यासाठी जात असताना सौदागर कुटुंबावर काळाने घाला घातला. हा अपघात बुधवारी रात्री दीडच्या सुमारास झाला.
मन्सुब निजामुद्दीन सौदागर निजामुद्दीन अब्दुलनबी सौदागर (वय ६९), सफुरा निजामुद्दीन सौदागर (वय ५८), मन्सुब निजामुद्दीन सौदागर (वय ४०), नाफिया मन्सुब सौदागर (वय ३५), तैयबा मन्सुब सौदागर (वय ६), आकसा मन्सुब सौदागर (वय ४ वर्षे), अहमदरजा मन्सुब सौदागर (वय २ वर्षे, सर्व रा. मदिहाळ डेअरी भंडारी गल्लीरोड, धारवाड, राज्य कर्नाटक) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात चालक शहाबाज इस्माईल भंडारी (वय ३०) हा गंभीर जखमी झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निजामुद्दीन सौदागर आणि सफुरा सौदागर हे दाम्पत्य हज यात्रेला जाणार होते. त्यांना सोडण्यासाठी मुलगा मन्सुब आणि सून नाफिया हे आपल्या तीन चिमुकल्यांसह मुंबईला निघाले होते. कर्नाटकातून हे सर्वजण कारने (के २५ एमसी ४३५९) कोल्हापूरमार्गे मुंबईला निघाले होते. शहाबाज भंडारी हा कार चालवत होता.
कऱ्हाडजवळ त्यांनी जेवण केल्यानंतर हे सर्वजण पुढील प्रवासाठी निघाले. सातारा तालुक्यातील काशीळ गावाजवळ आल्यानंतर चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे भरधाव असलेली कार महामार्गाकडेला असलेल्या गुलमोहरच्या झाडावर जोरदार आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, सहाजण जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
कारमध्ये अडकलेल्या तैयबा सौदागर आणि चालक शहाबाज भंडारी याला कसेबसे बाहेर काढले. त्यानंतर दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तैयबा सौदागरचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात संपूर्ण सौदागर कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कर्नाटकातील धारवाडमध्ये सौदागर कुटुंबीयांचा फूल विक्रीचा व्यवसाय होता. हज यात्रेला जाण्यापूर्वीच या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.