सावंतवाडी, दि. 22 - आंबोली येथील लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केलेला युवक जोझिंदर बलदेवसिंग विर्क हा पंजाबमधील मोठा ड्रग्स तस्कर असून, त्याच्यावर पंजाबमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारमध्ये पोलिसांना नशेची इंजेक्शन मिळाली असून, अपहरण केलेल्या प्राध्यापिकेची एटीएम कार्डही सापडली आहेत. जोझिंदरच्या शोधासाठी पंजाबच्या महासंचालकांनी वरिष्ठ अधिका-यांची सहा पथके तैनात केली होती. मात्र त्याला पकडण्यात कोणालाच यश येत नव्हते.जोझिंदर बलदेवसिंग विर्क हा 11 सप्टेंबरपासून पंजाब येथून बेपत्ता आहे. त्याने आपल्या सोबत दिलप्रीत कैर या प्राध्यापक युवतीचे अपहरण करून आणले होते. कैर हिच्या वडिलांनी पंजाब पोलिसात तक्रार दिली. त्या तक्रारीनंतर पंजाब पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तैनात केली होती. ही पथके देशाच्या विविध भागात तपास करीत होती. मात्र जोझिंदर याचा तपास लागत नव्हता. पंजाब पोलिसांनी जोझिंदर याच्या मोबाईल लोकेशनचा ठावठिकाणा घेत गोवा गाठले होते. जोझिंदर हा पंजाबमधील मोठा ड्रग्स तस्कर असल्याने अनेक वेळा त्याचे गोव्याला येणे जाणे होते. त्यामुळे तो गोव्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांना होता. त्यासाठी एक पथक गोव्यात ठाण मांडून होते. पंजाब पोलिसांनी आंबोली दूरक्षेत्रातील पोलिसांना जोझिंदरची माहिती दिली होती. तो वापरत असलेली कार मिळाली तर त्याला ताब्यात घ्या, असे सांगितले होते. त्याने एका मुलीचे अपहरण केल्याचेही पंजाब पोलिसांनी स्थानिक पोलिसांना सांगितले होते. पण जोझिंदर याने पोलीस पकडतील या भीतीने आंबोलीपासून चार किलोमीटर अगोदरच आपली कार पार्क केली. त्यामुळे आंबोली पोलिसांना तो सापडला नाही. त्यातच बुधवारी त्याने एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्यांच्या कारची पंजाब व स्थानिक पोलीस झाडाझडती घेतली. कारमध्ये नशा येणारी औषधे सापडली. तसेच काही ड्रग्सची पाकिटेही आढळून आली आहेत. या शिवाय बेपत्ता प्राध्यापिका दिलप्रीत कैर यांची एटीएम कार्ड तसेच सौंदर्य प्रसाधनाचे सामान कारमध्ये आढळून आले आहे. याशिवाय कारमध्ये एक कोयता व बारीक चाकूही सापडला आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून, या कारची फॅरेन्सिक टीम तपास करणार आहे. दरम्यान, मृत जोझिंदर यांचे नातेवाईक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सावंतवाडीत पोहोचणार असून, पोलीस त्यांचा रितसर जबाब घेऊन मृतदेह ताब्यात देणार आहेत. मात्र बेपत्ता प्राध्यापिकेबाबत अद्यापपर्यंत पंजाब व स्थानिक पोलिसांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे या प्राध्यापिकेचे नेमके काय झाले याचे गूढ कायम आहे. कारमध्येही रक्ताचा मोठा सडा पोलिसांना आढळून आला आहे. त्यामुळे जोझिंदर याने प्रथम तिचा खून केला आणि नंतर आपण आत्महत्या केली असे तरी केले नसावे ना असा संशयही पोलीस व्यक्त करीत आहेत. नातेवाईक दाखल मात्र घटनेबाबत कानावर हात आत्महत्या केलेल्या युवकाचे नातेवाईक गुरुवार रात्री उशिरा सावंतवाडीत दाखल झाले असून त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे याची भेट घेतली. शुक्रवारी सकाळी पंजाब पोलीस सावंतवाडीमध्ये येणार असून नंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सध्या त्या युवकांचा मृतदेह सावंतवाडीमधील कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या युवकाबाबत त्याचे नातेवाईकही माहिती देण्यास तयार नाहीत. युवकांचे वडील राज्यपालाच्या गाडीचे सारथी होते आत्महत्या केलेल्या जोझिंदर याचे वडील बलदेवसिंग विर्क हे राज्यपालांच्या गाडीचे सारथी होते, मात्र सध्या ते निवृत्त आहेत. मात्र जोझिंदर हा त्यांच्या नावावरच अनेक उद्योग करीत होता. अपहरण केलेल्या प्राध्यापिकेशीही त्याने खोटी बतावणी करून लग्न करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती ही पुढे येत आहे.
कारमध्ये नशेची इंजेक्शन व युवतीचे एटीएम, आंबोलीत आत्महत्या केलेला युवक ड्रग्स तस्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 7:10 AM