ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - दारूच्या किंवा अन्य कोणत्याही नशेत असलेल्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्ही चांगलेच अडचणीत येऊ शकतात. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार नशेत असताना एखाद्या महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दिली तरी त्याला वैध मानता येणार नाही असं म्हटलं आहे.
नशेत असताना एखाद्या महिलेने शारीरिक संबंधाला परवानगी दिली तरी ती ग्राह्य धरता येणार नाही कारण नशेत असल्याने महिलेची मनःस्थिती वेगळी असते. सेक्ससाठी महिला एकदाही नाही म्हणाली तर तिची इच्छा नसल्याचं मानलं जातं असं कोर्टाने म्हटलं आहे, याप्रमाणे जर महिला पूर्ण शुद्धीत हो म्हणाली असेल तर बलात्कार मानलं जाणार नाही.
पुण्यातील एका सामूहीक बालात्काराच्या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमुर्ती मृदुला भाटकर यांनी हा निर्णय दिला. आयपीसी कलम 375 नुसार प्रत्येक होकाराला ग्राह्य धरता येणार नाही त्याचप्रमाणे शारीरिक संबंधाला महिला विरोध करत नसेल याचा अर्थ तिचा होकार आहे असाही होत नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं.