मुंबई, दि. 31- मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना सोशल मीडिया, राजकारणी आणि सगळीकडे मुंबईवर अशी परिस्थिती नेमकी का आली? याचीच चर्चा सुरू आहे. मुंबईवर आलेल्या या संकटाबद्दल प्रत्येक ठिकाणी विविध चर्चा ऐकायला मिळतात. मंगळवारी मुंबईत आलेल्या या परिस्थितीवरून शिवसेना आणि महापालिकेवर चौफेर टीका होत असताना आता सामनातून शिवसेनेने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचं शिवसेना किंवा महापालिकेवर खापर फोडणं हा अन्याय असल्याचं सामनामध्ये म्हंटलं गेलं आहे. तसंच मुंबईसारख्या शहरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम नाही का?, असा सवालही सामानातून विचारण्यात आला आहे.
सामनामध्ये गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात म्हंटलं आहे,मुंबईत मुसळधार पाऊस झाला व मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाची दैना उडाली असे चित्र निर्माण केले जात आहे. सव्वीस जुलैनंतरचा सर्वाधिक पाऊस पडला व तो फक्त मुंबईतच पडला असे नाही, ज्या महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नाही तेथेही तो पडला आहे. मुंबई-नाशिक महामार्ग या काळात कोलमडून गेला. मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरची वाहतूक बंद ठेवण्यात आली; कारण शेवटी सुरक्षेचा व लोकांच्या जीविताचा प्रश्न होता. मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांनी उगाच घराबाहेर पडू नये अशी आवाहने करणे सोपे असते, पण ज्यांचे पोटच हातावर आहे व रोज बाहेर पडल्याशिवाय चूल पेटत नाही त्यांना तर बाहेर पडावेच लागेल. नोकरदार वर्गास बाहेर पडू नका, असे सांगणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच ठरतो. तरीही जीव धोक्यात घालू नका. घरी तुमची बायको-मुले वाट पाहात आहेत, असे एका माणुसकीच्या नात्याने सांगावे लागते. त्यात मुंबई म्हटले की, पालिकेवर ठपका ठेवण्याची आता एक फॅशनच झाली आहे. मग मुंबईसारख्या शहरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम नाही काय? की तुम्ही फक्त मुंबईची आर्थिक लुटच करणार आहात. खरे म्हणजे मुंबईची नालेसफाई चोख झाल्यामुळेच चोवीस तासांत पाण्याचा निचरा झाला. मुंबई सात बेटांची बनली आहे व समुद्राने मुंबईस वेढले आहे. भरती-ओहोटीचे प्रकार असतातच. पुन्हा त्या एमएमआरडीएने जे रस्ते खणून ठेवले व जागोजागी ढिगारे केले त्याचे खापर तुम्ही शिवसेना किंवा महापालिकेवर फोडताय हा अन्याय आहे. जे स्वयंभू शहाणे असे आरोप करीत आहेत त्यांच्या ‘कौन्सिलिंग’ची गरज असून पालिका आयुक्तांनी हे प्रयोगही आता जरूर करावेत.