मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या फुले-आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एकाने अचानक शाईफेक केली. अचानक घडलेल्या या घटनेनं आणि घोषणाबाजीमुळे गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे,” असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.
कोणी फेकली शाई?डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. शाई फेकणाऱ्याचे मनोज गरबडे असे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरात परिचित आहे.
काय म्हणाले होते पाटील?पैठणमध्ये शुक्रवारी कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली, असे विधान केले. शाळा सुरू करताना तुम्ही सरकारी अनुदानावर अवलंबून का राहता? डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे ते म्हणाले. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे स्पष्टीकरण दिले.