पिंपरी : आरोग्याचा चातुर्मास ही अभिनव संकल्पना असून, या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा मोफत पोहोचवण्यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, असे उपक्रम राज्यभरात राबविण्यात यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बोपोडी येथील डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुरेश कांबळे, आदित्य माळवे, कमलेश चासकर, अभय सावंत, कार्तिकी हिवरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी शासन प्राधान्य देत असून, शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून कर्करोग, हृदयरोग यांसारख्या दुर्धर आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आरोग्याचा चातुर्मास ही नवीन संकल्पना असून, या संकल्पनेमध्ये केवळ आरोग्य तपासणीच होत नाही, तर आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून या उपक्रमासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल.आमदार विजय काळे यांनी आयोजनामागचा हेतू विशद केला. ते म्हणाले, की आजच्या शिबिरात आतापर्यंत ९०० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, सायंकाळपर्यंत दोन हजार महिलांची तपासणी होईल. शहरात अन्य ठिकाणीही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.’’
आरोग्याचा चातुर्मास अभिनव संकल्पना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 2:58 AM