ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 8 - पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचे जाणून जिल्ह्यातील राजरत्न व अण्णाभाऊ साठे संस्थेने शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करण्याचा अभिनव संकल्प घेतला असून कार्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्या या संकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्यावरण अबाधित राखण्याकरिता वृक्ष लागवड करुन जतन व वृक्ष संवर्धनाचा संदेश देत शासनाच्या हाकेला साद देत जिल्हयात समाजकार्याचा वसा जोपासत ५०१ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. ५०१ वृक्ष लागवड करीत सुंदर वाशिम, स्वच्छ वाशिम व हिरवेगार वाशिम करण्याचा संकल्प करीत पहिल्या टप्प्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अण्णाभाऊ साठे बहुउदेशिय कला, क्रीडा व शिक्षण संस्था रिठद, राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहुउदेशिय संस्था वाशिमच्या सहयोगाने वृक्ष लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी विशेषत: वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग वाशिमचे वनअधिकारी नांदुरकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या संस्थेच्या वतीने केवळ वृक्षारोपण करुन शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार बनविण्याचा संकल्पच केला नसून सोबतच वृक्ष लागवड कशी करावी, जतन , संवर्धन, वृक्षापासून होणरे फायदे नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भविष्यातील पिढीसाठी वृक्ष लागवड करण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्यदेखील केले जात आहे. यासाठी तालुका क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर, विनोद पट्टेबहादूर, भारत गवळी, विनोद जवळकर, कलीम मिर्झा, महादेव क्षिरसागर, जयंतकुमार इंगोले, रत्नशोभीत अंभोरे, अरविंद उचित, दत्तराव वानखडे, संदिप राऊत, अनिल थडकर, शेख जमिर, सत्येंद्र भगत सहकार्य करीत आहेत.
शासनाच्यावतीने वृक्ष लावण्याबाबत जनजागृती केल्या जात आहे. याला प्रभावित होवून सर्वाधिक युवकांचा समावेश असलेल्या सदर संस्थेतील पदाधिकारी, सदस्यांनी काही तरी वेगळे करण्याचा मानस व्यक्त केला. त्यातून हा उपक्रम पुढे आला असल्याने सर्वांनी संकल्प केला.
सर्वांचेच योगदान
वृक्षरोपण करणे सोपे आहे परंतु त्याचे संगोपन करणे कठीण आहे. संस्थेच्यावतीने सकल्प घेण्यात आला तेव्हा सर्वांना याची जाण करुन देण्यात आली. परंतु आपल्या हातून चांगले कार्य घडत आहे म्हणून सर्वांनी होकार देत हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांचे यात चांगले योगदान लाभत आहे. - भगवान ढोले, विनोद पट्टेबहादूर