नरेंद्र जावरे, चिखलदरा (जि़ अमरावती)१८ दिवसांच्या बाळाला तप्त विळ्याचे चटके (डम्बा) देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम दवाखान्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याचे वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे. मेळघाटातील १८ दिवसांच्या नवजात बालकाला जडलेल्या पोटफुगीच्या आजारावर मांत्रिकाने अघोरी डम्बा पद्धतीने उपचार केल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारी प्रकाशित झाल्याने खळबळ उडाली. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवत चौकशीला सुरुवात केली आहे़ दरम्यान, मेळघाटात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या अघोरी डम्बा पद्धतीवर अंकुश लावून मांत्रिकावर फौजदारी दाखल करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत.
मेळघाट प्रकरणाची चौकशी करा
By admin | Published: April 10, 2015 4:09 AM