सोलापूर : औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाच्या दुरवस्थेसंदर्भात माजी शिक्षणमंत्री आणि ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टने वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वांचेच लक्ष वेधले असून, फेसबुकवरील या पोस्टची दखल घेत, राज्याचे वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पुढील आठवड्यात ‘घाटी’ची पाहणी करून रुग्णालयाच्या दुरवस्थेची चौकशी करणार असल्याचे येथे सांगितले.डॉ. लहाने यांनी सकाळी येथील छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयातील सुविधांची पाहणी केली. पत्रकारांशी संवाद साधताना दर्डा यांच्या घाटी रुग्णालयातील गैरसोयीसंदर्भातील फेसबुक पोस्टचीही चर्चा झाली. यावर डॉ. लहाने म्हणाले की, राजेंद्रबाबूजी यांनी या रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत टाकलेली पोस्ट मी पाहिली. तेथे औषधांचा तुटवडा आहे. नातेवाईकांनाच रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जावे लागत आहे. खरं म्हणजे तेथील ही स्थिती दुर्दैवी आहे. दर्डा यांची पोस्ट पाहिल्यानंतर मी लगेचच ‘घाटी’च्या अधिष्ठातांशी चर्चा केली. रुग्णालयात असे का घडत आहे, याबाबत शासनाला खुलासा करा, असा आदेश त्यांना दिला आहे.पुढील सप्ताहात औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगून डॉ. लहाने म्हणाले, या दौºयात मी ‘घाटी’ची पाहणी करणार आहे. रुग्णालयात नेमके असे काय होतेय, याची चौकशी करणार आहे. तेथे कशा सुधारणा करता येतील, हे पाहणार आहे.घाटी रुग्णालय खरोखरच लोकोपयोगी असून, तेथे लवकरच प्रशासकीय पातळीवर सुधारणा करण्यात येतील, अशी ग्वाहीही डॉ. लहाने यांनी दिली.दर्डा यांची पोस्ट अशी...औरंगाबाद घाटी हॉस्पिटलमध्ये औषधांचा, डिस्पोजेबल्सचा तीव्र तुटवडा, नातेवाइकांनीच रुग्णांना ट्रॉलीवर ढकलत नेणे, प्रशासनाची अनास्था, हे दयनीय दृश्य नित्याचेच... असे घाटी रुग्णालयाच्या दुरवस्थेचे वर्णन करून, दर्डा यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये रुग्णाला नातेवाईकच स्ट्रेचरवरून घेऊन जात असल्याचे छायाचित्र अपलोड केले आहे. या पोस्टवरून ‘घाटी’मधील गैरसोयीबाबत राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
घाटीच्या दुरवस्थेची चौकशी करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 4:26 AM