BMC च्या फक्त २ वर्षांच्या नाहीतर मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 03:38 PM2022-10-31T15:38:52+5:302022-10-31T15:39:30+5:30

मुंबई महापालिकेत दोन वर्षात घोटाळा झाल्याचा भाजपाला आता साक्षात्कार झाला असून फक्त दोनच वर्षांच्या कामाची चौकशी केली जाणार आहे. भाजपाला जी काही चौकशी करायची ती करू द्या पण ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत असं काँग्रेसनं म्हटलं. 

Inquire about the works of BMC in just 2 years or last 25 years; Congress demand | BMC च्या फक्त २ वर्षांच्या नाहीतर मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा; काँग्रेसची मागणी

BMC च्या फक्त २ वर्षांच्या नाहीतर मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा; काँग्रेसची मागणी

googlenewsNext

मुंबई - राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची चौकशी कशाला करता मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करावी असं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. 

नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाला ब्लॅकमेल करत असतो. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कसे आले हे सर्वांनी पाहिले आहे. एक तर ईडी, आयकर, सीबीआयच्या कारवाईची भिती दाखवायची नाहीतर पैशाचे आमिष दाखवून आमदार-खासदार फोडायचे हे त्यांचे काम आहे. मुंबई महापालिकेत दोन वर्षात घोटाळा झाल्याचा भाजपाला आता साक्षात्कार झाला असून फक्त दोनच वर्षांच्या कामाची चौकशी केली जाणार आहे. भाजपाला जी काही चौकशी करायची ती करू द्या पण ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षही २५ वर्ष सत्तेत होता. या काळात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी ते का करत नाहीत? चौकशी करायची तर मुळापासून करायली हवी, मात्र केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाईची मागणी केली जात आहे, हे राजकीय द्वेषातून सुरु आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून जनतेत संभ्रम निर्माण करायचा व आपली राजकीय पोळी भाजायची हे भाजपाचे कारस्थान आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला. 

दरम्यान, कोरोना काळात मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची जगानेही दखल घेतली आहे मात्र भाजपाला त्यात भ्रष्टाचार दिसत आहे. भाजपाच्या राज्यात कोरोनाकाळात किती भयानक स्थिती होती हे आपण पाहिले आहे पण स्वतःच्या कारनाम्यांकडे दुर्लक्ष करायचे व विरोधकांवर आरोप करायचे हा खेळ लोकांना समजतो. मुंबईतील जनताही भारतीय जनता पक्षाच्या अशा ब्लॅकमेलिंगला ओळखून आहे असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: Inquire about the works of BMC in just 2 years or last 25 years; Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.