मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी मोबाइलवर कथित संभाषण झाल्याचा आरोप करणाऱ्या आपच्या नेत्या प्रीती शर्मा-मेमन यांच्यासह वडोद्याचे मनिष भंगाळे आणि जयेश दवे या तिघांची मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेकडून चौकशी करा, अशी मागणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, आपला ९४२३०७३६६७ या नंबरचा मोबाइल बंद असताना व तसा सीडीआर रिपोर्ट असतानाही आपल्या मोबाइलचे क्लोन करून त्यातल्या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. एखाद्या हॅकरने आपल्या नंबरचे सिमकार्ड क्लोन करून बेकायदेशीररीत्या वापरल्याचे स्पष्ट होते. शिवाय, मनिष भंगाळे आणि जयेश दवे यांना पाकिस्तानची वेबसाइट हॅक करण्यासाठी ८५ लाख रुपये पुरविण्यात आल्याची माहिती त्या दोघांनी पत्रकार परिषदेत दिली होती. याचा अर्थ ही रक्कम त्यांना कोणी व कोणत्या हेतूने पुरवली हे चौकशीतून समोर यायला हवे, असे खडसे यांनी पत्रात म्हटले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६५ व कलम ६६ एफ १, ब अंतर्गत अशी दुसऱ्या देशाची वेबसाइट हॅक करणे आणि त्याची माहिती सार्वजनिक करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची चौकशी तत्काळ करण्यात यावी, अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.दरम्यान, मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसोबत या विषयाचे सादरीकरण केल्याचे समजते. या प्रकरणी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)
‘त्या’ तिघांच्या हेतूची चौकशी करा
By admin | Published: May 25, 2016 2:53 AM