नागपूर : सिंचन घोटाळा प्रकरणात गुरुवारी राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून विदर्भातील ४० सिंचन प्रकल्पांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चार प्रकरणांवर सरकारने लक्ष केंद्रित केले असून, घोडाझरी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या एका प्रकरणात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सरकारने नमूद केले आहे.याचिकाकर्ता जनमंच संस्थेने एका अर्जाद्वारे मोखाबर्डी येथील प्रकल्पाची किंमत १६ कोटी असताना ती वाढवून कंत्राटदाराला ३२ कोटी देण्यात आले असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. घोटाळ्याचे आॅडिट करण्याची मागणी करण्यात आली. नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण गवई व न्या. प्रदीप देशमुख यांनी राज्य सरकारला येत्या १७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. घोडाझरी भ्रष्टाचारप्रकरणी एसीबीने मुख्य अभियंता (निवृत्त) सोपान सूर्यवंशी, निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश वर्धने, एफ. ए. कन्स्ट्रक्शन्सचा संचालक फतेह खत्री, निसार फतेह खत्री, जैतून खत्री, अबिद खत्री आणि जाहिद खत्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदर्भातील ४० सिंचन प्रकल्पांची चौकशी सुरू
By admin | Published: March 04, 2016 3:31 AM