कल्याण : माघी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात बीभत्स नृत्य करणा-या कर्मचा-यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्ष काँग्रेसने केली आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त दीपक पाटील यांच्याकडून त्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. यासंदर्भातला अहवाल आयुक्त मधुकर आर्दड यांना सादर केला जाणार आहे.सोमवारी गणेशोत्सवानिमित्त डोंबिवली विभागीय कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी पालिका कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत बीभत्स नाच करून लावणी नर्तकींवर पैसे उधळले होते. हे त्यांचे विलासी प्रताप मोबाइल कॅमेऱ्यात कैद होऊन व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वत्र पसरले. कर्मचाऱ्यांच्या या कृत्यातून महापालिकेची बदनामी झाली असून असे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे. दरम्यान, या प्रकाराची चौकशी सुरू असून याचा अहवाल आयुक्तांना देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया उपायुक्त पाटील यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)
केडीएमसी कर्मचा-यांच्या प्रतापाची चौकशी सुरू
By admin | Published: January 29, 2015 5:35 AM