मुंबई : गिरण्यांच्या जमिनींची विल्हेवाट लावताना गिरणी मालक, बिल्डरांना फायदा पोहोचेल अशा पद्धतीने विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीसी रुल्स) बदल करण्याच्या तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या निर्णयाची चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भूखंडाचे श्रीखंड खाल्ले कोणी, असा सवाल करीत या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला. नियमावलीमध्ये केलेले बदल हे राज्य शासन, महापालिका आणि म्हाडाच्या हिताचे नसताना ते करण्यामागचा हेतू काय होता? कुणाच्या फायद्यासाठी कुणी बदल केला, याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात वरळी; मुंबई येथील सेंच्युरी मिल आणि ज्युपिटर मिलच्या विकासकांनी डीसी रुल्सनुसार भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केले नसल्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता. गिरण्यांच्या जमिनींचा विकास करताना विकास नियंत्रण नियमावलीनुसार मनोरंजन मैदान, उद्याने, शाळा आणि महाविद्यालयांसाठीचे भूखंड महापालिकेला का हस्तांतरित केले नाहीत? असा सवाल शिंदे यांनी केला. त्यावर डीसी रुलमधील बदलाचा हा निर्णय त्यावेळी सरकाने का घेतला माहीत नाही; पण हा निर्णय शासन, महापालिका आणि म्हाडाच्या हिताचा नव्हता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील डीसीआर घोटाळ्याची चौकशी
By admin | Published: April 06, 2016 5:18 AM