वैभव गायकर, पनवेलसैराट चित्रपटाची कथा ‘बोभाटा’ या कादंबरीवरून चोरल्याप्रकरणी पनवेल न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. नवनाथ माने यांनी २०१०मध्ये ही कादंबरी लिहिली होती. या प्रकरणी माने यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती. कादंबरीची कथा चोरल्याप्रकरणी न्यायालयाने कामोठे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. कोट्यवधींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट व त्यामधील कलाकार रातोरात प्रसिद्ध झाले. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या कादंबरीतील कथेत थोडाफार बदल करून चित्रपट तयार केल्याचा आरोप माने यांनी केला आहे. यासंदर्भात ३० सप्टेंबरपर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने कामोठे पोलिसांना दिले आहेत. ‘बोभाटा’ कादंबरीत ग्रामीण भागातील जातीच्या भिंती, प्रेमाची कथा, यातून निर्माण होणारा संघर्ष याचे वर्णन करण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीदेखील कादंबरीचे कौतुक केले होते. कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी खुद्द माने यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र नागराज मंजुळे यांनी ही कथा चोरल्याने माने यांचे स्वप्न भंगले असल्याची माहिती त्यांचे वकील अभिषेक येंडे यांनी दिली.
‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश
By admin | Published: August 31, 2016 5:46 AM