मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षांच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. गृहविभागाने त्याबाबतचा आदेश शुक्रवारी काढला.विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०१६-१७ या काळात ते खासदार असताना राज्यात त्यांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. प्रत्यक्षात आज काढलेल्या आदेशात २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या फोन टॅपिंग प्रकरणांची चौकशी केली जाईल. तसेच, या कालावधीत अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप करण्यात आले होते का याचा तपास केला जाईल व तसे आढळल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे म्हटले आहे.पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करेल. समितीमध्ये आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा), मुंबई हे सदस्य असतील. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात याबाबतची सर्व वस्तुस्थिती मांडली जाईल, असेही गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंगची चौकशी, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती देणार अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:21 AM