Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएतील राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज उद्योगपती, अभिनेते-कलाकार, क्रिकेट विश्वातील मंडळी, संत-महंत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आमदारांना शपथबद्ध केले जाणार आहे.
राजभवनावर जाऊन महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, यावर एकनाथ शिंदे यांचे एकमत होते नव्हते. शपथविधी सोहळ्याला काही तास राहिले असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांची मनधरणी केली. शपथविधी सोहळ्यानंतर अमित शाह यांच्याशी बैठक होण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर अखेर मानापमान नाट्यावर पडदा पडला आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. विधानसभा निकाल लागल्यानंतर १२ दिवसांमध्ये महायुतीत मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय घडले, ते सांगितले.
उपमुख्यमंत्री होण्यास एकनाथ शिंदे कसे तयार झाले? १२ दिवसांत काय घडले?
एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासह महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार नव्हते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, निकालानंतर महायुतीच्या पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी समर्थन दिले होते. मात्र त्यानंतर शिंदेंनी सरकारमध्ये न जाता समन्वय समितीचे प्रमुख पद घ्यावे आणि महायुतीचा कारभार व्यवस्थित हाकण्यावर देखरेख करावी, असा सल्ला काही शिवसेनेच्या नेत्यांनी दिला होता. शिवसेनेच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आपल्याचा पक्षाचा व्हावा, असे वाटत होते. माझे आणि एकनाथ शिंदेंचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, २०१९ सालीही भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आले होते. तरीही २०२२ साली एकनाथ शिंदेंना मुख्यंमत्री केले. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उठाव करत मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मला वाटते की, त्यावेळी शिंदेंनी मोठी जोखीम उचलली होती. कारण असे निर्णय कधी कधी तुमचे राजकारण संपवू शकतात. त्यामुळेच मीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव देऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे. कारण शिंदेंना मुख्यमंत्री केले तर त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना आत्मविश्वास मिळेल. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी सर्व काही सांगता आले नाही. पण यावेळी भाजपाचे संख्याबळ प्रचंड असल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद देता आले नाही. कारण असा निर्णय घेतला असता तर देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये एक चुकीचा संदेश गेला असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. ते इंडिया टुडेच्या मुलाखतीत बोलत होते.