मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन आता १ वर्ष उलटला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद उघडपणे चव्हाट्यावर येताना दिसले. या वादाला सुरुवात झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या जागेवरून. कल्याणमध्ये स्थानिक भाजपा नेत्यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर श्रीकांत शिंदेंनीही माझ्यामुळे युतीत बिघाड होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं स्पष्ट विधान केले.
श्रीकांत शिंदे यांच्या या विधानानंतर युतीत बेबनाव असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर आले. कल्याण डोंबिवलीतील भाजपाचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात विधाने केली. त्यानंतर लगेच प्रमुख वृत्तपत्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती मिळाल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात देवेंद्र फडणवीसांना शिंदेपेक्षा कमी मते मिळाल्याचे दाखवले. त्यामुळे ही नाराजी आणखी वाढली. भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये उघडपणे एकमेकांविरोधी वक्तव्ये येऊ लागली. युतीतील हा वाढता तणाव पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली.
युतीतील वादानंतर पहिल्यांदाच पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एकत्र आले होते. शिंदे-फडणवीस यांच्या देहबोलीवरून दोघांमध्ये वाद गंभीर असल्याचे दिसून आले. परंतु कुठेतरी विरोधकांना आयती संधी मिळू नये त्यासाठी वादावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. त्यामुळे पालघरमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक झाली. त्यात कल्याण डोंबिवलीतील वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्याची भूमिका घेत युतीत अशाप्रकारे एकमेकांविरोधी विधाने करणे योग्य नाही. आपल्याला मिळून सरकार चालवायचे आहे अशी भूमिका घेतली. रवींद्र चव्हाण यांना फडणवीस यांनी योग्य सूचना दिल्या त्यानंतर कल्याण डोंबिवली वादावर पडदा पडला.
त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांनी जाहिरातीच्या विषयावर उपमुख्यमंत्र्याशी बोलले पाहिजे. त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे असा सल्ला दिला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होकार देत तात्काळ श्रीकांत शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलावले. सह्याद्रीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांच्यात बैठक झाली. जाहिरातीवर जी नाराजी होती त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर दोन्ही प्रमुख नेत्यांनी आपापल्या टीमवर नियंत्रण ठेवले पाहिजे. एखादी भूमिका मांडायच्यापूर्वी चर्चा करायला हवी. एकमेकांविरोधी वक्तव्ये दोन्ही पक्षातील नेत्यांनी टाळावेत. जर एखादी भूमिका घ्यायची असेल तर दोन्ही नेत्यांचा ग्रीन सिग्नल हवा. निवडणुकीत कुठेही दगाफटका होणार नाही यासाठी दोन्ही पक्षांनी काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीला तडे जाताना दिसतायेत त्यात आपल्या भांडणाचा विरोधकांना फायदा होऊ नये अशी सामंजस्याची भूमिका एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी घेत युतीतील वादावर पडदा टाकला.