नीरा : पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील पालखीतळाची पालखी सोहळा समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष भेट देऊन नुकतीच पाहणी केली. पुरंदर तालुक्यातील विविध गावांतील पालखीतळांना या समितीने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे भेटी देऊन पालखीतळांची पाहणी करून विविध सूचना केल्या आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी हा संयुक्त दौरा करण्यात आला आहे. या वेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर यांच्यासह पुरंदर-दौंड उपविभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सहायक अभियंता माने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ताजीराव चव्हाण, नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, गणपत लकडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, संजय भंडारी, प्रमोद काकडे, उमेश चव्हाण, भाऊसाहेब धायगुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नीरा शहरातील पालखी मार्गालगत गेल्या वर्षी काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा रेल्वेस्थानक परिसरापासून पालखीतळापर्यंत थाटलेले गेले आहे. बसस्थानक परिसरात अधिक प्रमाणावर प्रामुख्याने अतिक्रमण वाढले आहे. मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसमोरील अतिक्रमण तातडीने काढण्याचे स्पष्ट आदेश महिन्यांपूर्वी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी देऊनही सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.या वेळी पालखी मार्गालगतची ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दत्ताजीराव चव्हाण, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण यांच्या हस्ते पालखी सोहळा समितीचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.(वार्ताहर)>पोलिसांना सूचना : पर्यायी मार्गाने वाहतूकपालखीकाळात सोहळ्यातील पाण्याचे टॅँकरला आणि नीरा शहरात पाणीपुरवठा केंद्रातून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासंबंधी नीरा ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आली. पालखी मार्गक्रमण करताना पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यासंबंधी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी यांनी पालखीतळाची पाहणी करून व्यवस्थेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केले.सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्याची सूचना प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
पालखीतळाची प्रशासनाकडून पाहणी
By admin | Published: June 09, 2016 1:37 AM