ऑनलाइन लोकमत/अशोक परदेशी जळगाव, दि. 5 - भडगाव येथील १४ जानेवारी २०१६ रोजी सकाळी १० वाजेची ही घटना. घराला आग लागली होती. बालिकेचा रडण्याचा आवाज कानी पडला. घरात बालिकेशिवाय कोणीही नव्हते. आई- वडील बाहेर होते. त्या क्षणी कोणताही विचार न करता निशा पाटील ही आग लागलेल्या घरात ती शिरली आणि म्हणूनच बालिकेला वाचवू शकली. कोणताही स्वार्थ न पाहता जो संकटात असेल त्याला मदतीचा हात दिला पाहिजे. हे विचार मनात बिंबले होते. मुलींनी शिक्षणात प्रगती केली, त्या शिक्षित झाल्या तर शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारीत पाठ आत्मसात करत असतात. आणि मदत करण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता धाडस करतात. इयत्ता आठवीतला हिंदीतील पाठातला धडा गिरवल्याचे निशाने या घटनेबाबत सांगितले. त्यातूनच खरी प्रेरणा मिळाल्याची ती म्हणते. या चिमुरड्या बालिकेचा जीव वाचवून एकप्रकारे ‘बेटी बचाओ.. बेटी पढाओ’चा संदेश तिच्याकडून मिळत आहे. या धाडसी कार्याबद्दल मिळालेल्या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने निशा आनंदून गेली आहे. स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. की, मला पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. हा माझ्या आयुष्याचा अविस्मरणीय क्षण आहे, असेही ती सांगते. दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते माझा सन्मान झाला. तेथील भव्य-दिव्य वातावरण पाहून मी आश्चर्यचकीत झाले. सैन्य दलातील तिन्ही अधिकारी व त्यांचा ताफा पाहून आपणही या पदापर्यंत पोहोचावे व देशसेवा करावी असे वाटले. हा क्षण मी विसरू शकत नाही. या पुरस्कारामागे माझ्या शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी तसेच आई आणि वडील या सर्वांचे श्रेय आहे, असेही ती विनम्रपणे नमूद करते. दिल्ली येथून परतल्यावर गावात निशाची मिरवणूक निघाली. गावकऱ्यांसह तिचे मित्र- मैत्रीण सहभागी झाले.भडगाव येथील आदर्श कन्या विद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी निशा दिलीप पाटील हिने यशवंतनगर भागात कस्तुरबाई देशमुख यांच्या घरास लागलेल्या प्रचंड आगीतून मोठ्या धाडसाने सात महिन्यांची चिमुरडी पूर्वी देशमुख हिचे प्राण वाचविले होते. तिच्या या साहसाची नोंद घेत तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे नुकतेच गौरविण्यात आले. याचबरोबर शाळेची चमकदार विद्यार्थिनी म्हणून दिल्लीहून गावात परतल्यावर निशाची आदर्श कन्या विद्यालयामार्फत भडगाव शहरातून १ रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्या धाडसामुळे तिचा नावलौकिक झाले त्या धाडसाची प्रेरणा शालेय धड्यातूनच मिळाल्याचे ती सांगते. राष्ट्रीय शौर्य सन्मानाने आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. आई किरण आणि वडील दिलीप पाटील हे मोलमजुरी करतात. घरची स्थिती गरिबीची असतानाही खूप शिकून आयपीएस अधिकारी व्हायचे आहे आणि देशाची सेवा करायची हे माझे स्वप्न आहे. - निशा पाटील, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त.
शालेय पाठातून निशाला मिळाली धाडसाची प्रेरणा
By admin | Published: February 05, 2017 10:45 AM