दीपस्तंभ संस्था संचलित प्रकल्पांनी समाजातील वंचित, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना समाजातील मुख्य प्रवाहात आणले आहे.पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेतून स्पर्धा परीक्षा, ग्रामीण विकास, मनोबल विकास अशा ज्ञानाची शिदोरी घेऊन बाहेर पडलेले यजुर्वेद महाजन यांनी २००५मध्ये ‘दीपस्तंभ फाउंडेशन’ची स्थापना केली; आणि आज या इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. पाहता पाहता ‘दीपस्तंभ’ने अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाच सनदी अधिकारी म्हणून तयार केले नाही, तर शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या विद्यार्थ्यांनाही वाट दाखवत त्यांच्या आयुष्याचा गाडा रुळावर आणला आहे.गेल्या ११ वर्षांत संस्थेत शिकलेल्या शेकडो मुलांनी अधिकारी दर्जाच्या सरकारी नोकरीत पदार्पण केलेले आहे. यामध्ये धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील सामोडे गावचा भिल्ल वस्तीत जन्माला आलेला आणि समाजातील पहिला सनदी अधिकारी असलेला डॉ. राजेंद्र भारुड. अंमळनेर तालुक्यातील डांगरी नावाच्या खेड्यात जन्मलेला पोलीस अधिकारी झालेला संदीप मखमल पाटील. सातपुड्याच्या पर्वतरांगेतील उमर्टी या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या निर्मला प्रेमसिंग पावराचे वडील अंध असून आई शेतमजुरी करते. दीपस्तंभामुळे तिच्या शिकण्याच्या ऊर्मीला आधार मिळाला आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन ती विक्रीकर अधिकारी झाली, अशी अनेक उदाहरणे देता येतील.पण ही झाली, शारीरिकदृष्ट्या धडधाकट मुलांची कामे. ते सुरू असताना काही तरी अपूर्ण असल्याची खंत यजुर्वेद यांना सतावत होती. कशाचा तरी शोध सुरू होता, हेही जाणवायचं. परंतु दोन वर्षांपूर्वी हा शोध संपला; आणि देशातील पहिल्या, अंध-अपंगांसाठीच्या निवासी स्पर्धा परीक्षा केंद्राचा जन्म झाला. हात, पाय, डोळे नसले तरी प्रचंड मनोबलाच्या बळावर आकाश कवेत घेता येते, ही जिद्द जागविण्याचा प्रकल्प म्हणून याचे नाव ‘मनोबल’! महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षा घेऊन प्रज्ञाचक्षू असलेल्या व विशेष मुला-मुलींची या केंद्रातील प्रवेशासाठी निवड करण्यात आली.कर्नाटकातील कोनगोली येथून मनोबल केंद्रात आलेला अपंग नरसगोंडा रावसाहेब चौगुले, कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी नावाच्या लहानशा गावातून आलेल्या, जन्मत:च अंध असलेल्या सुनीता दिनकर सनदी आणि रुचिरा दिनकर सनदी या बहिणींच्या बोलण्यातून हा आत्मविश्वास जाणवतो. अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिले निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्ये प्रशिक्षण केंद्र म्हणजे ‘मनोबल’ होय. कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजना गरीब, दुष्काळग्रस्त, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा निवासी प्रशिक्षण केंद्र म्हणजे ‘गुरुकुल’ होय. ग्रामीण व आदिवासी भागात अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीवर व इतर अनेक संकटांवर मात करून काही विद्यार्थी उत्तम गुणांसह पदवीधर होतात. मात्र आत्मविश्वास, मार्गदर्शन व आर्थिक सहकार्याच्या अभावामुळे त्यांना उच्च स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना गुरुकुल प्रकल्पात नि:शुल्क निवासी प्रशिक्षण दिले जाते. ज्यांचे जगात कोणीही नाही, ज्यांना प्रेम, मैत्री या भावनांची कधी ओळखच झाली नाही, अशा युवक-युवतींना आयुष्यात सन्मानाने उभे करण्यासाठी दीपस्तंभ संस्थेने ‘संजीवन’ प्रकल्प सुरू केला आहे. स्वयंदीपच्या माध्यमातून शेकडो अपंग महिलांना नियमित रोजगारासोबतच आत्मविश्वास, आत्मसन्मान मिळावा हे उद्दिष्ट आहे.प्रांजल पाटील आणि अल्पना दुबे या दोन प्रज्ञाचक्षू मुली या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या मनोबल प्रकल्पातील प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. याव्यतिरिक्त १४ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची विविध प्रशासकीय पदांवर निवड झाली आहे.दीपस्तंभ संस्था संचलित मनोबल प्रकल्पाने सोलापूरच्या लक्ष्मी नावाच्या विद्यार्थिनीला ३ वर्षांसाठी नि:शुल्क निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. या विद्यार्थिनीला दोन्ही हात नसून तिने पायाने पेपर लिहून १२वीत ६८ टक्के गुण मिळविले आहेत. तिला आयएएस होण्याची इच्छा आहे. शिक्षणतज्ज्ञ हरीष बुटले यांनी दीड लाख रुपये लक्ष्मीच्या शिक्षणासाठी निधी दिला आहे.
प्रेरणादायी ‘दीपस्तंभ’
By admin | Published: June 18, 2017 12:06 AM