अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भरपूर साहित्य निर्माण केले; परंतु काही तथाकथित साहित्यिकांनी त्यांच्या साहित्याची नेहमीच अवहेलना केली; मात्र तुकडोजी महाराजांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. राष्ट्रसंतांचे साहित्य, विचार, तत्त्वज्ञान आज समाजाने स्वीकारले आहे. राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या साहित्यातून नेहमीच रचनात्मक कार्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, मोझरीचे प्रचारप्रमुख बबनराव वानखडे यांनी शुक्रवारी येथे केले. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहातील साहित्यरत्न सुदामदादा सावरकर सभागृहात आयोजित ३ रे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे प्रा. डॉ. भास्करराव विघे होते. प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. गुरुदेव सेवा समितीचे सरचिटणीस जनार्दन बोथे, ज्येष्ठ प्रचारक ह.भ.प. आमले महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, ह.भ.प. तिमांडे महाराज, डॉ. सुभाष भडांगे, प्रगतिशील शेतकरी श्रीकृष्ण ठोंबरे, कृष्णा अंधारे, वंदन कोहाडे, उद्योजन एकनाथ दुधे, ज्येष्ठ प्रचारक सुधा जवंजाळ, मथुरा नारखेडे, रामदास देशमुख आदी उपस्थित होते.
खासदार-आमदारांचे वेतन, भत्ते बंद करा!
शेतकरी नापिकी, दुष्काळासारख्या परिस्थितीला तोंड देत आहे. त्यांना मदत करण्याऐवजी शासन कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करून पगारवाढ देत आहे; परंतु शेतकर्यांच्या मालाला भाववाढ देत नाही. खासदार-आमदारांचे वेतन, भत्ते वाढविण्यात येतात. मात्र, शेतकर्यांना कर्जमाफी देत नाही. खासदार-आमदारांचे वेतन आधी बंद केले पाहिजे, अशी मागणी कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी केली.