- स्नेहा मोरेब-याचदा मुंबईच्या वाहतूककोंडीत रुग्णवाहिकेला मार्गक्रमण करणे कठीण जाते. याशिवाय, रुग्णवाहिकेसाठी आकारावे लागणारे शुल्कही वेगवेगळे असते. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन मित्रांनी मिळून ‘डायल४२४२’ हे अॅप सुरू केले. या अॅपच्या माध्यमातून केवळ माणसांनाच नव्हे तर पाळीव प्राण्यांसाठीही त्वरित रुग्णवाहिकेची सुविधा मिळते हे वैशिष्ट्य आहे.अॅपचे संस्थापक व संचालक जितेंद्र लालवानी यांनी संकल्पनेची सुरुवात करताना सांगितले की, माझ्या वडिलांना आजारपणामुळे दोन महिन्यांच्या अंतराने रुग्णालयात न्यावे लागत असे. त्या प्रत्येक वेळी रुग्णवाहिकेचे शुल्क वेगवेगळे असायचे हा अनुभव होता. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी ही संकल्पना डोक्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात कशी साकारावी याविषयी कळत नव्हते. मग यावर अभ्यास करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे, शहरातील वाहतूक, मार्ग, रुग्णवाहिकांची संख्या, प्रमाण, वेळेचे व्यवस्थापन अशा अनेक मुद्द्यांविषयी मित्रपरिवाराशी विचार विनिमय करून या अॅपच्या संकल्पनेचा जन्म झाला. या अॅपची सेवा पहिल्यांदा केवळ कुटुंबीय आणि नातलंगासाठी सुरू केली. या पायलट प्रोजेक्टनंतर सेवेचा विस्तार करण्यात आला आणि तो कमी काळात अत्यंत यशस्वी ठरला. या अॅपसाठी सीओओ हिंमाशू शर्मा आणि सहसंस्थापक नीलेश महांब्रे यांचे सहकार्य लाभले आहे.‘डायल४२४२’ या अॅपवर तांत्रिकदृष्ट्या विकसित आणि युजर फ्रेंडली व्हीलचेअर टॅक्सींची सुविधा सुरू केली आहे. ही सेवा रुग्णालयातील फेºया किंवा वैद्यकीय अपॉइंटमेंट्ससाठी वापरता येणार आहे. दळणवळणाची समस्या असलेल्या रुग्णांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासमाध्यमे पुरवण्याचा प्रयत्न आहे. याव्यतिरिक्त पाळीव प्राण्यांसाठीच्या रुग्णवाहिकांची वाढती मागणी आणि पुरवठा यातील अंतर भरून काढण्यासाठी डायल४२४२ने आता पाळीव प्राण्यांसाठीच्या रुग्णवाहिकाही सुरू केल्या आहेत. पाळीव प्राण्यांच्या मालकांना सहजरीत्या आपल्या प्राण्यांसाठी रुग्णवाहिका मिळू शकणार आहेत. ही प्राण्यांसाठीची सुविधाही आपत्कालीन वैद्यकीय सेवांसह सज्ज आहे.याविषयी हिमांशू शर्मा म्हणाले, वैद्यकीय दळणवळणाच्या वाढत्या गरजा लक्षात आल्यामुळे गरजूंना सामान्य रुग्णवाहिकांपलीकडे वैशिष्ट्यपूर्ण सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचबरोबर, रुग्णवाहिकांची संख्या वाढवून नेटवर्कमध्येही वाढ करण्यावर भर असणार आहे. मे २०१७ मध्ये नुकतीच स्थापन झालेल्या डायल४२४२ या सेवेला अल्पावधीतच ग्राहक आणि रुग्णवाहिका सुविधेशी संबंधित व्यावसायिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अॅपच्या माध्यमातून केवळ माणसांनाच नव्हे तर पाळीव प्राण्यांसाठीही त्वरित रुग्णवाहिकेची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 5:58 AM