मुंबई - आपल्या विभागात काय काम करायचे? हे ही दुस-या मंत्र्यांना विचारणा-या मंत्र्यांने कर्नाटक सरकारच्या भवितव्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या अपयशी कारभाराचा व त्यामुळे महाराष्ट्राच्या झालेल्या नुकसानीचा विचार करावा, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना लगावला आहे.
या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार घोटाळ्यामुळे राज्याचे आर्थिक नुकसान तर झाले आहेच. परंतु शेतक-यांना दुष्काळात ढकलण्याचे काम राम शिंदे यांच्या विभागाने केले आहे. राज्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाढती संख्या ही या सरकारच्या अकार्यक्षम कारभाराचे प्रतिक आहे. कर्नाटकातल्या सरकारची चिंता करण्यापेक्षा या मंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या, दुष्काळ यासारख्या राज्यातील ज्वलंत समस्यांकडे लक्ष द्यावे. कर्नाटकात सरकार चालवण्यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते सक्षम आहेत असा निर्वाळा खा. चव्हाण यांनी दिला.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरु आहे. येनकेन प्रकारे सत्ता मिळवण्यासाठी पैसा व सरकारी यंत्रणांचा गैरवापर हीच भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपने अनैतिकतेचा कळस गाठला आहे. संविधानिक प्रक्रिया व लोकशाही प्रक्रियेवर भाजपचा विश्वास नाही, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून मोदी शाह यांचा सत्तापिपासू चेहरा पूर्णपणे उघडा पडला आहे. गुजरातमध्ये आमदार फोडणे,उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश,मणिपूर, गोवा, बिहार, जम्मू काश्मीर, तामिळनाडू या सर्व प्रदेशांमध्ये राज्यपालासारख्या संविधानिक संस्थांचा गैरवापर करून सरकार स्थापन्याचे प्रयत्न करणे. सत्तेचा दुरुपयोग करून आमदार फोडणे. पैशाचा प्रचंड वापर करून विविध राज्यातील सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न मोदी शाह यांनी केलेला आहे.
कर्नाटक सरकार अस्थिर करण्याकरिता महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून कमावलेला पैसा वापरला जात आहे असा आरोप खा. चव्हाण यांनी केला. राज्यात कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यामध्ये बैठका होतात. पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठकांत काय होत आहे? हे सर्व आमच्या समोर आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन होण्यापूर्वीच या अनैतिक मार्गाचा वापर मोदी शाह जोडीने यापूर्वीच केलेला आहे. या हुकुमशाही व फॅसिस्ट विचार धारेचा विरोध करून काँग्रेसचे सरकार पूर्णपणे स्थिर राहील व आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करून येणा-या निवडणुकांमध्ये जनताच लोकशाहीला पायदळी तुडवणा-या भाजपला पराभूत करून सत्तेची मस्ती उरवेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.