अमळनेर (जि. जळगाव) : दूध समजून किटकनाशकातील रिकाम्या बाटलीतील पाणी प्यायल्याने, तब्बल १५ दिवस बेशुद्ध असलेला समाधान सुनील बडगुजर हा साडेचार वर्षांचा बालक डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आला.समाधान घराबाहेर खेळत असताना, त्याला अंगणात कीटक नाशकाची खाली बाटली मिळाली. त्याने बाटलीत पाणी ओतले असता, दुधासारखा फेसाळ द्रव बाटलीतून बाहेर पडू लागला. ते दूध आहे, असे समजून समाधानने ते पिऊन टाकले. काही क्षणात त्याच्या तोंडाला फेस येऊन तो बेशुद्ध पडला. त्यास अमळनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती खालावल्याने, त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. समाधान मृत्यूशी झुंज देत होता. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बडगुजर समाज बांधवांनी लोकवर्गणी जमा केली. राजकीय पदाधिकाऱ्यांनीही मदतीचा हात दिला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचविले. २१ व्या दिवशी समाधानने डोळे उघडले. डॉ. अनिल शिंदे यांनी वैद्यकीय खर्चात सूट दिली. आता त्याला कळमसरे येथे घरी नेण्यात आले आहे. त्याच्यावर औषोधोपचार सुरू आहे. काळ आला होता. मात्र, वेळ आली नव्हती, अशी भावना त्यांच्या पालकांची आहे. समाधानचे वडील सुनील हे कळमसरे येथे सालदारकी करतात. (प्रतिनिधी)
दुधाऐवजी कीटकनाशक घेतलेले बालक वाचले
By admin | Published: April 12, 2017 1:30 AM