मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावर शनिवारी भाष्य केले. एकदाच काय त्या निवडणुका होऊन जाऊ दे... एकेक फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.
सायन, ॲटॉप हिल येथील माजी नगरसेवक मंगेश सातमकर, तृष्णा विश्वासराव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येते, मग ते उधाण रागाचे, त्वेषाचे, जिद्दीचे आहे… आपली जिंकण्याची ईर्ष्याही आणखी वाढत आहे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांचे कौतुक करत जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत त्यांना ‘जय महाराष्ट्र’. ज्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ द्या. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
- पाच वर्षांनंतर एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे त्यांना आता कळले. कारण अमिबामध्ये एक पेशीच असते. तो वाकडातिकडा कसाही असतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर निशाणा साधला.