नवी दिल्ली : २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमातून सूर्यनमस्कार वगळण्यात आल्यानंतर आता सरकारने आणखी नमते घेत योगासने करताना श्लोक म्हणणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करून देशातील मुस्लिम बांधवांना मोठ्या संख्येत या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. योगासने करताना मुस्लिम बांधव श्लोक म्हणण्याऐवजी अल्लाचे नामस्मरण करू शकतात, असे प्रतिपादन योगदिन कार्यक्रमाचे नियोजन करणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी येथे केले. देशात योगदिन कार्यक्रमात लोकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे आणि कुठल्याही वादंगाशिवाय तो सुरळीत पार पडावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.मुस्लिम समुदायातील काही गटांनी सरकारतर्फे योगदिन कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रामुख्याने यात सूर्यनमस्कार समाविष्ट करण्यावर आक्षेप घेतला आहे; परंतु काही मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी नाईक यांची भेट घेऊन योगाला विरोध करणारे मानवतेचे शत्रू असून योगाचे धर्माशी काही एक देणेघेणे नाही, अशी भावना व्यक्त केली. यावरून कुठलाही वाद टाळण्यासाठी योगदिन कार्यक्रमात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही; परंतु सूर्यनमस्काराचा धर्माशी संबंध नाही,अशी स्पष्टोक्ती नाईक यांनी केली. नाईक यांनी सुदृढ आरोग्यासाठी नियमित योगासने आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना याला विरोध करणारे दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला.
श्लोकाऐवजी ‘अल्ला हो अकबर’ म्हणा
By admin | Published: June 12, 2015 4:04 AM