ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - पंतप्रधान नरेंद्र मोदी "मन की बात" करण्यात व्यस्त आहेत. मात्र त्यांनी आता "मन की बात" नव्हे "गन की बात" करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित शिवसेना लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात उद्धव ठाकरे बोलत होते. काश्मीर पेटला आहे, जवानांची मुंडकी उडवली जातायत. तरीही नरेंद्र मोदींची मन की बात सुरू आहे, आता मोदींनी गन की बात करून पाकिस्तानला अद्दल घडवावी. किती वर्ष सहन करायचे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मी काहीही बोललो तर सरकारच्या विरोधात आहे, असे बोलले जाते. विकास आराखड्यात जर भूमिपुत्रांना न्याय मिळणार नसेल तर त्याला विरोध करणार आहे. विकास आराखड्याकडे लक्ष दिले नाही तर मुंबईचा मूळ रहिवासी बाहेर फेकला जाईल. शिवसेनेला कोणीही संपवू शकत नाही म्हणून मुंबईमध्ये रहिवाश्यांना पुनर्विकासाच्या नावाखाली बाहेर फेकले जाते आणि अशा लोकांचे नावे मतदार यादीमध्ये नसतात. सोयीप्रमाणे विकास आराखडा बनवायचा आणि पास करून घ्यायचा हे चालू देणार नाही. महापालिकेचे राखणदार म्हणजे जागते रहो असे नाही, खरा राखणदार मुंबईकरांचा विचार करणारा असला पाहिजे. देशामध्ये वावटळ निघाले होते तरी पण मुंबईमध्ये शिवसेना आली याचं ब-याच नेत्यांनी कौतुक केलं आहे. मुंबईवर भगवा फडकवा म्हणजे शिवसेना मुंबईसाठी धावून येते. 1992 मध्ये शिवसेना धावून आली नसती तर मुंबईचा विकास आराखडा बिघडला असता. मुंबईतील एकही झाड तोडू देणार नाही. एका ठिकाणी गोहत्यावर बंदी करायची आणि दुस-या बाजूला झाडे तोडायची असे चालू देणार नाही, यूबी महापालिकेत संमत करू नका बस झाले. यूबी म्हणजे काय उल्लू बनाविंगची कामे सुरू होती. आता हे चालू देणार नसल्याचाही इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
"मन की बात"च्या ऐवजी "गन की बात" करून पाकला धडा शिकवा- उद्धव ठाकरे
By admin | Published: May 02, 2017 9:40 PM