मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंतच्या प्रस्तावित मुंबई सागरी किनारा रस्त्याचा प्रस्ताव सार्वजनिक करण्याचे व त्यावर नागरिकांच्या सूचना मागविण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी हा प्रस्ताव पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, आता या रस्त्याबाबत नागरिकांनी सूचना पाठवाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.प्रस्तावित सागरी किनारा रस्त्याची लांबी ३३.२०७ किलोमीटर आहे. रस्त्यावर ४ अधिक ४ अशा ८ मार्गिका आहेत. भराव टाकून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याची लांबी ८.८७ किलोमीटर आहे. खारफुटीच्या परिसरात भराव टाकून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याची लांबी ३.३५ किलोमीटर आहे. पुलांची संख्या ८ असून, पुलांची लांबी ५.८ किलोमीटर आहे. २ स्वतंत्र मार्गिका असणाऱ्या बोगद्यांची लांबी ५.६० किलोमीटर आहे. ४ स्वतंत्र मार्गिका असणाऱ्या बोगद्यांची एकूण लांबी ५.८७ किलोमीटर आहे. उन्नत मार्गिकेची लांंबी ३.८ किलोमीटर आहे. एकूण भरावभूमी क्षेत्र १६८ हेक्टर एवढे आहे. प्रकल्पातून अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध होणारे मनोरंजन आणि खेळाच्या मैदानासाठी ९१ हेक्टर क्षेत्र आहे. सागरी किनारपट्टी मार्गातून बाहेर पडण्यासाठीचे एकूण १२ मार्ग आहे.सागरी किनारा मार्गामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोड या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होईल. शिवाय इंधनाची बचत होईल. त्याचप्रमाणे जलद बससेवा मार्गिका प्रस्तावित असून, त्यामुळे पश्चिम मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. या प्रकल्पांतर्गत किनारा संरक्षक समुद्री भिंत बांधण्याचे प्रस्तावित आहे.
कोस्टल रोडबाबत मागविल्या सूचना
By admin | Published: June 25, 2015 1:43 AM