थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. अशातच दिल्लीत अमित शाह यांनी शिवसेनेच्या आमदारांना आपल्या दालनात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
शिवसेनेचे खासदार अमित शाह यांची भेट घेणार आहेत. परंतू त्यात शिंदेंचे पूत्र श्रीकांत शिंदे नसणार आहेत. शिंदे हे दिल्लीहून मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत. अशातच ही मोठी घडामोड घडत असून पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशातच अजित पवारांनीही सरकारमध्ये महत्वाची खाती मिळावीत म्हणून हालचाली सुरु केल्या आहेत. अजित पवारांनी सुनिल तटकरेंना दिल्लीत अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास लावली आहे. तत्पूर्वी तटकरेंनी फडणवीसांची देखील भेट घेतली आहे. मुख्यमंत्री पद सोडून जास्तीत जास्त महत्वाची खाती आपल्याकडे घ्यायची ही शरद पवारांची रणनिती होती. तीच रणनिती अजित पवारही अवलंबत आहेत.
नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला २३५ हून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. त्यात भाजपाला सर्वाधिक १३२, शिवसेना शिंदे गटाला ५७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपाला छोटे पक्ष आणि अपक्षांनी पाठिंबा दिल्याने भाजपा बहुमताजवळ पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार की भाजपा मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.