कोल्हापूर : महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविणे, स्थलांतरीत किंवा नियमितीकरण करण्याची कार्यवाही तत्काळ करा. त्याबरोबरच सन २००९ नंतरची ३६ अनधिकृत बांधकामे हटविण्याचे काम प्राधान्याने करा, असे निर्देश गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे तसेच महापालिका आणि महसूल विभागांचे पोलिस दलांशी असलेले विषय याबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक एस. चैतन्या, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सन २००९ पूर्वीची ३१८ अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे होती. यापैकी १८८ अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाच्या नियमितीकरणाचे प्रस्ताव असून १३० धार्मिक स्थळांची बांधकामे स्थलांतरीत तसेच हटविण्याची कायर्वाही करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याचे निर्देश
By admin | Published: April 30, 2016 5:03 AM