- कमल शर्मा
नागपूर : औष्णिक वीज केंद्रात कोळसा तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल-मेमध्ये भारनियमन करावे लागले. राज्यात सध्या तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मान्सून सक्रिय झाला असून, औष्णिक वीज केंद्रामध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे.
अशा परिस्थितीत मान्सूननंतर विजेची मागणी वाढली तर ती पूर्ण करणे कठीण जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात अनेक कोळसा खाणींमध्ये पाणी जमा होते. कोळशाची वाहतूकही कठीण होऊन जाते. त्यामुळे वीज केंद्रामध्ये पावसाळा लागण्यापूर्वीच कोळशाचा जास्तीत जास्त साठा वाढवणे आवश्यक असते. महाजेनको मान्सूनपूर्वी किमान १५ दिवस व त्यापेक्षा अधिकचा साठा तयार करीत असतो.
यावर्षी पहिल्या सहा वर्षात कोळशाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंडोनेशिया येथून २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात केला जात आहे. परंतु यानंतरही वीज केंद्रांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. कोराडी (६६० मेगावॉट) वीज केंद्रात ३.५७ दिवस, भुसावळ ५.११ दिवस व परळी येथे ६.२० दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. वीज केंद्रात ७ दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर त्याला संवेदनशील मानले जाते. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारसमोर वीज संकटाचे आव्हान उभे ठाकले आहे.
औष्णिक वीज केंद्रातील स्थिती वीज केंद्र - साठा (दिवसांचा)कोराडी (६६०) - ३.५७ कोराडी (२१०) - १०.०७ नाशिक - १३.२३भुसावळ - ५.११ परळी - ६.२० पारस - १२.२३चंद्रपूर - ९.०३ खापरखेडा - ९.४३
महाजेनकोला परिस्थिती आटोक्यात आणण्याचा विश्वास यासंदर्भात महाजेनकोचे अधिकारी उघडपणे काही बोलायला तयार नाही. परंतु नाव न छापण्याच्या अटीवर कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याची बाब ते मान्य करीत आहेत. आयात होणाऱ्या कोळशाच्या भरवशावर ही परिस्थिती आटोक्यात आणू, असा विश्वासही अधिकाऱ्यांना आहे.