संत व हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणे काँग्रेसची जुनी परंपरा : चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 30, 2021 12:42 PM2021-01-30T12:42:15+5:302021-01-30T12:51:40+5:30
राम मंदिरासाठी गोळा झालेला निधी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लुबाडला जाऊ शकतो असा इशारावजा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी दिला.
पुणे: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीच्या नावावर महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात येत आहे. मात्र ही सर्व रक्कम राम मंदिराच्या उभारणीकरिता निर्माण करण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये जमा होईल याची खबरदारी जनतेने घ्यावी. अन्यथा भाविकांची लूट होण्याची शक्यता आहे असा इशारा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे. मात्र या वक्तव्यावरून आता काँग्रेस- भाजप मध्ये मोठा वाद पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.कारण भाजपकडून देखील सावंत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतानाच काँग्रेसवर जहरी शब्दात हल्लाबोल करण्यात आला आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिर निर्माणासाठी नव्हे तर एका राजकीय पक्षासाठी निधी गोळा करत असल्याचा आरोप काँग्रेसचा केला जात आहे. तसेच रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा आहे. राम मंदिरासाठी गोळा झालेला निधी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लुबाडला जाऊ शकतो असा इशारावजा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी दिला. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची जुनी परंपरा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाले, काँग्रेसने केलेल्या आरोपांबद्दल मला थोडेसेही आश्चर्य वाटले नाही. कारण, संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे. राम जन्मभूमी ट्रस्टवर आरोप करण्यापूर्वी आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी 1.11 लाख रुपये आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 11 चांदीच्या विटा या राम मंदिरासाठी दिल्या आहेत? की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिल्या आहेत ? हे काँग्रेसने आपल्या नेत्यांना सुद्धा विचारावं, असा खडा सवाल देखील यावेळी पाटील यांनी काँग्रेसला विचारला आहे.