मुंबई : दहीहंडी पथकांसह आयोजकांनीही ‘स्पॉट विमा’ काढावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय दहीहंडी समन्वय समितीने शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला.अवघ्या ७५ रुपयांत दहा लाखांचे विमा कवच गोविंदासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील सर्व गोविंदा पथकांनी त्वरीत विमा काढावा. त्याचप्रमाणे, आयोजकांनीही जागेचा विमा काढावा. जेणेकरून अपघात घडल्यास गोविंदांना उपचार खर्च मिळण्यास मदत होईल, असे दहीहंडी समन्वय समितीने म्हटले आहे.परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात शनिवारी ही बैठक पार पडली. आगामी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाशी निगडीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. गोविंदांची सुरक्षा, बाल गोविंदाचा उत्सवातील सहभाग, सेलिब्रेटींवर पैसे उधळणे, विमासक्ती, सराव-उत्सवादरम्यान सुरक्षेची काळजी, गोविंदांचे होणारे मृत्यू अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर समिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उहापोह केला. या वेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी उपस्थित होते.विमा अधिकारी सचिन खानविलकर यांनी पथकांना विम्याविषयी मार्गदर्शन केले.गोविंदा पथकांना विमा सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोजकांनीही ‘स्पॉट विमा’ काढावा, सेलिब्रेटी - डीजे आदी प्रकार उत्सवात टाळावे, बाल गोविंदाना उत्सवात सहभागी करून घेऊ नये, असे बैठकीत ठरले.- बाळा पडेलकर-पाटील, दहीहंडी समन्वय समिती
दहीहंडी आयोजकांसह आता गोविंदा पथकांनाही विमासक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 5:41 AM