मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत राज्य सरकारला इशारा दिला आहे. चार मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर राज्यभरात आंदोलन मनसेकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. यातच, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाकडून मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेशइतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागाने सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.
राज ठाकरेंवर गुन्हा1 मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत 12 अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला 6 अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम 116, 117, 152 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अभी नही तो कभी नही, राज ठाकरे ठाममशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत भोंगे हटवावे या मागणीवर राज ठाकरे ठाम आहे. भोंगे हा सामाजिक विषय आहे हा धार्मिक विषय नाही. अभी नहीं तो कभी नही असं म्हणत राज ठाकरेंनी एकदाच काय ते होऊन जाऊद्या असा इशारा औरंगाबादच्या सभेत दिला. 4 मेपासून ऐकणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या अल्टीमेटमला काही तास शिल्लक असताना राज्यात राजकीय हालचाली बैठका वाढल्या आहेत. शिवतीर्थ इथं मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भोंगे हटवण्याबाबतच्या आंदोलनावर चर्चा करण्यात आली.