वैभववाडी : आंतरराज्य दरोडेखोर उत्तम राजाराम बारड (25, रा. धामोड, ता. राधानगरी) याला वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर एलसीबीने अटक करण्यापूर्वी तो दोन महिने कोकिसरेत वास्तव्यास असताना तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरू होते. त्यामुळेच वैभववाडी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून, त्या चो-यांचा छडा लागतो का ? हे पाहावे लागणार आहे.उत्तम बारड हा कंपनीचा एजंट म्हणून कोकिसरे फाटकानजीक दोन महिने पत्नीसह भाड्याने राहत होता. त्या कालावधीत २६ जानेवारी २०१७ च्या रात्री बेळेकरवाडी येथे राहणारे श्रीराम शिंगरे यांचे घर अज्ञाताने फोडले होते. त्यानंतर महिनाभरातच टीव्ही, फ्रिजचे शोरुम फोडून चोरट्याने एलसीडी लंपास केला होता. त्याच रात्री कासार्डे तिठ्यावरील कापड दुकानही फोडण्यात आले होते.कोल्हापूर एलसीबीने बारडला कोकिसरेतून रातोरात उचलून नेला होता. त्यावेळी त्याने कासार्डेतील चोरीची कबुली दिली मात्र, त्याच रात्री झालेल्या वैभववाडीतील चो-यांबाबत त्याने अद्याप तोंड उघडलेले नाही. त्यामुळे शोरुममधील एलसीडी चोरीच्या तपासासाठी सोमवारी कणकवली पोलिसांकडून वैभववाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उत्तम बारड याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यात दरोड्यांचे असंख्य गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील चो-या, घरफोड्या त्याच्याकडून कबूल करून घेताना पोलिसांचे कसब पणास लागणार आहे. पोलीस हवालदार राजू जामसंडेकर त्या चोरीचा तपास करीत आहेत.
आंतरराज्य दरोडेखोर उत्तम बारडचा ताबा वैभववाडी पोलिसांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 8:03 PM