संजय खांडेकर अकोला, दि. १३- आरोग्यासाठी बहुगुणी असलेली गुळवेल तस्करी करणारी राजस्थानची आंतरराज्यीय टोळी अकोल्यात काही महिन्यांपासून सक्रिय आहे. उंटास चारा घेण्याच्या नावाखाली नागरी आणि ग्रामीण भागातून गुळवेल गोळा करून आयुवैद औषधी कंपन्यांना त्याची विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.गत काही महिन्यांपासून अकोल्यातील नागरी वसाहतींमध्ये उंट सवारीच्या नावाखाली मुलांना फेरफटका मारून आणणारी मंडळी सर्वत्र दिसते. दहा-वीस रुपये घेऊन उंट सवारीची सेवा ही मंडळी देत असते. फेरफटका मारीत असताना या मंडळीची टेहळणी परिसरात सुरू असते. निंबाच्या किंवा जुन्या वृक्षावर कुठे गुळवेल दिसली की ही मंडळी उंटासाठी चारा घेऊ का, म्हणून विचारणा करते. गुळवेलचे महत्त्व नसणारे अनेक जण सहजपणे वेल तोडण्याची परवानगी देतात. गुळवेलची पाने उंटाला चारल्यानंतर वेलीच्या दांड्या घेऊन ही मंडळी त्यांच्या तांड्यावर येते. वास्तविक गुळवेलच्या पानापेक्षा त्या कांड्यांचीच या मंडळीला आवश्यकता असते. तांड्याजवळ गुळवेलचा मोठा-साठा करून तो वन औषधी करणार्या कंपनीला विकला जातो. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून बायपास मार्गावरील लोक पाहत आहेत. याची माहिती काही जागरूक नागरिकांनी लोकमतला दिली. राजस्थानी मंडळीच्या गुळवेल तस्करीमुळे अकोला परिसरातील बहुगुणी वनस्पती नष्ट होत असून याकडे कु णी गांभीर्याने पाहण्यास तयार नाही.- बायपास मार्गावर जवळपास चाळीस उंट आणि शेकडो महिला-पुरुषांचा तांडा दोन महिन्यांपासून वसला आहे. शहरातील आजूबाजूच्या नागरी वसाहतीतून ही मंडळी गुळवेल तोडून आणते. मोठा साठा झाला की ट्रक द्वारे हा साठा बाहेरगावी पाठविला जात असल्याचे आम्ही पाहत आहोत.- अजय जहागीरदार, नागरिक, बायपास मार्ग अकोला.लिव्हर टॉनिक गुळवेलमोठय़ा झाडांच्या मुळापासून तर फांद्यापर्यंत गुळवेल आपले जाळे विणत नेते. निंबाच्या झाडावर असलेली गुळवेल औषधी गुणधर्मात महत्त्वपूर्ण मानली जाते. लिव्हर टॉनिक म्हणून गुळवेलला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. गुळवेलचे सत्त्व मोठमोठय़ा कंपन्या किलो ग्रामच्या भावाने विक्री करतात, अशी माहिती वनस्पती तज्ज्ञ संदीप वाघाळकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गुळवेल तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय
By admin | Published: January 14, 2017 12:50 AM